Sat, Apr 20, 2019 08:06होमपेज › Satara › काहीजण मी केलं असा डंगोरा पिटतात

काहीजण मी केलं असा डंगोरा पिटतात

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:40PMमेढा : वार्ताहर

सातारा जिल्ह्यावर या सरकारने निधीबाबत अन्याय केला आहे. काहीजण भोळ्या भाबड्या जनतेला भूलथापा मारून मी केलं, मी केलं, असा डांगोरा पिटत आहे.तालुक्यातील भाजपा सेनेचे कार्यकर्ते मी निधी मंजूर करून आणला की आमच्या सरकारनं दिला, असा उर बडवून घेतात. मात्र, त्यांना अगोदर निधी आणायचे सुचत नाही, असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.

भव्य डोंगरी परिषद व विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभात आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. नरेंद्र पाटील, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, व मान्यवर उपस्थित होते.

 आ. शिवेंद्रराजे म्हणाले, डोंगरमाथ्यावरील रस्त्यांमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या विभागातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व दळणवळणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आमदार म्हणून डोंगरी गावांना निधी कमी पडू देणार नाही. डोंगरी भागातील रस्ते करताना वन विभागामुळे बर्‍याच अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, आता त्याकडे दुर्लक्ष करून कामे केली जातील, असे आश्‍वासन आ. शिवेंद्रराजे यांनी दिले. 

आ. शशिकांत शिंदे म्हणाले डोंगर भागातील गावांच्या विकासाचा पाया मी रचला आणि आ. शिवेंद्रराजे त्यावर कळस चढवायचे काम करत आहेत. डोंगरी भागातील छोट्या छोटया वाड्या, गावे यांची एक ग्रामपंचायत करण्यासाठी या अधिवेशनात आवाज उठवणार असून त्यामुळे डोंगरी गावांना स्वतंत्र निधी मिळेल. 

आ. पाटील, वसंतराव मानकुमरे, काशिनाथ पार्टे, तेजस शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंत्रालय उपसचिव आर. के . धनावडे, सभापती अरुणा शिर्के, जि.प. सदस्या सौ. अर्चना रांजणे, पं. स. सदस्या सौ. जयश्री गिरी, सौ. कांताबाई सुतार, सौरभ शिंदे, सुहास गिरी व ग्रामस्थ उपस्थित होते. संजय शेलाटकर यांनी प्रास्तविक केले. किशोर पार्टे यांनी आभार मानले.