Sun, Nov 18, 2018 12:06होमपेज › Satara › विधानपरिषदेस पुनर्वसनाची चुकीची माहिती

विधानपरिषदेस पुनर्वसनाची चुकीची माहिती

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:08PMढेबेवाडी : प्रतिनिधी

मेंढ - केकतवाडी (ता. पाटण) येथील वीस धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत विधानपरिषद सभागृहाला दुसर्‍यांदा प्रशासनाने  चुकीची व खोटी माहिती पुरवल्याचा आरोप केकतवाडीच्या प्रकल्पग्रस्ताने केला आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केकतवाडीचे गट प्रमुख पांडुरंग कुंभार यांनी केली आहे.

याबाबत पुनर्वसन प्रक्रियेतून डावलेले त्रस्त धरणग्रस्त पांडुरंग कुंभार यांनी पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना  याबातचे निवेदन दिले आहे. 1999 सालच्या पुनर्वसन आराखड्यानुसार आमचे ताईगडेवाडी (ता. पाटण) या गावठाणात पुनर्वसन करण्यात आले. मात्र आम्हाला  पुनर्वसन विभागानेच तिथून हुसकावून लावले. आमचे सांगली जिल्ह्यातील शिवाजीनगर (ता. कडेगांव) येथे पुनर्वसन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आम्ही सांगली जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी तुमचा सांगली जिल्ह्यातल्या कोणत्याही पुनर्वसीत गावठाणात समावेश नाही. सातारा जिल्ह्यातच पुनर्वसन करण्यात आले आहे, असे लेखी पत्र दिले आहे.

धरणाच्या जलाशयात शंभर टक्के बुडीत असलेल्या आमच्या कुटुंबांचे पुनर्वसन नेमके कुठे झाले आहे? हे आज अखेर कुणीही पुराव्यासह आम्हाला सांगितलेले नाही. पुनर्वसन  होणार की नाही ? या भितीपोटी आम्ही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे धाव घेतल्यावर त्यांच्या आदेशानुसार कोळे (ता. कराड) गावठाणात भुखंड दिले व पुन्हा दोनच महिन्यात काढून घेतले, म्हणून उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले तेव्हा न्यायालयाने कोळे गावठाणात  वाटप केलेले भूखंडच परत देण्याचे आदेश दिले. त्यानुसार भूखंड  परत दिले, पण जमिनी देण्यास नकार दिल्याचा दावा पांडुरंग कुंभार यांनी निवेदनाद्वारे केला आहे.