होमपेज › Satara › मराठीचं कैलास लेणं कुसुमाग्रज

मराठीचं कैलास लेणं कुसुमाग्रज

Published On: Feb 27 2018 8:55AM | Last Updated: Feb 27 2018 8:50AMसातारा : वंदना प्रकाश माने

बहरलेला प्राजक्‍त, असंख्य पारंब्यांना जन्म देत नव्याने निर्माण होणारा वटवृक्ष, का ज्ञानेश्‍वरांचे अस्तित्व जाणणारा अजानवृक्ष. कोण होते कुसूमाग्रज? मराठी माणसाला समृद्ध करणारा अग्निगर्भ शमीवृक्ष होते कुसुमाग्रज!

इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही हे परवलीचे वाक्य हल्ली ऐकायला मिळतं. त्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक झळ पोहोचत असताना इंग्रजी माध्यमांना जवळ केले जात इंग्रजी घोकंपट्टी सुरू होते, मराठीला कालबाह्य केले जात. काय समजणार त्यांना कुसुमाग्रज्यांचे शब्द, कशी होणार ही पिढी समृद्धी कसा आनंद घेणार अभिजात जीवनाचा ! ‘प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश’ म्हणणार्‍या कुसुमाग्रजांचे प्रेम आणि संस्कृती कशी येणार या पिढीत? जोतिबा फुले आणि लोकमान्य टिळकांचे पुतळे काय म्हणतात हे कस कळणार या नव्या पिढीला? आप्पासाहेब बेलवलकर आणि सरकारांच दुःख कस माहित होणार? हे सगळ का माहीत व्हायला हवंच त्याच कारण एकच आहे. तुम्ही समृद्ध होणार आहात खर्‍या अर्थान! ‘फक्‍त हो म्हणा’ ही ताकद येणार आहे तुमच्यात यामुळे आपण सुन्न  होऊन बसायच नाही. कारण स्थित्यंतर ही होत असतात. ती पहायची असतात. हाच समाज पुन्हा एकदा बदलेल याची वाट पहायची. पुढची पिढी जन्माला येईल आणि इंग्रजाळलेल सारं काही बाजूला करेल आणि माय मराठीचा आधार घेईल आणि ही माय मराठी पण तिला मोठ्या  मनान आधार देईल आणि मग ज्ञानेश्‍वरांच्या भाषेत  ‘अमृतातेही पैजा जिंकेन’ म्हणन सर्वदूर पसरेल त्यावेळी ही नवी पिढी ऐकेल नटसम्राट मधला आप्पासाहेब आणि कावेरीचा संवाद, नायक पहात असताना आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून देईल. नकळत आपण माणुसकी असलेला माणूस म्हणून दर्शन घडवेल. 

‘हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या’ बेभान होवून पाठ करेल. प्रेम कुणावर करायचं तेही शिकेल, मातीची दर्पोक्‍ती अभ्यासताना जीवनाचं सार सारं समजावून घेईल आणि काही काळ का होईना त्यानं रममाण होऊन आपलं आयुष्य कसं घडवायचं त्याचा विचार करताना सगळ्यांपुढे विनम्र होऊन आपलं चांगलं अस्तित्व जपून ते समृध्द करेल. 

आमच्या पिढीला कुसुमाग्रज पहायला, ऐकायला, वाचायला मिळाले. आम्ही खरोखर स्वत:ला धन्य समजतो. पृथ्वीचं प्रेमगीत म्हणत आमची पिढी जगत होती. आणि म्हणत होती. अलंकारण्या परी पाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. एखाद्या भव्यता, विशालता, दिव्यता हे सगळं समजल्यानंतर त्यापुढे फक्‍त विनम्र व्हायचं असतं हे कुसुमाग्रजांनी शिकवलं आम्हाला.  कालाय तस्मैय नम: असं म्हणत याकडे पाहिले पाहिजे. उद्या मराठी भाषा राज्य करेल आणि त्यावर अधिराज्य करेल. आमच्या कुसुमाग्रजांचं साहित्य निर्माण होईल. एक सुसंस्कृत शालीन सभ्य, नम्र अशी सुंदर पिढी आणि हीच पिढी अधिराज्य गाजवेल संपूर्ण जगावर ! मला वाटतं तो सुदिन लवकर येवोे आणि मग श्रीकांत लाडांनी आकाशस्य स्थिर केलेला  कुसुमाग्रज तारा अधिक तेजाने चमकू  लागेल. आणि त्याच्या तेजात ही नवी पिढी प्रकाशमान होईल.