होमपेज › Satara › लाभले आम्हास भाग्य... बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य... बोलतो मराठी

Published On: Feb 27 2018 8:55AM | Last Updated: Feb 27 2018 8:55AMकराड : प्रतिभा राजे

मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी 27 फेब्रुवारीला पाळला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ’मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वत: ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली आज तिच्याप्रती आदर व्यक्त  करण्यासाठीचा मंगलमय सोहळ्याचा दिवस.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय  मानतो मराठी


‘इये मर्‍हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी ’अशा शब्दांतून ज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेचा उल्‍लेख केला आहे. मराठी ही आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द ही बोलू शकते तशीच ही आपली मराठी आहे. हळुवार, गोड, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. वळवाल तशी वळणारी आपली मराठी भाषा आहे. 

मराठी माणूस कोण, याची एक साधी-सोपी पण अर्थपूर्ण व्याख्या प्रसिध्द लेखक आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एकतरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस. ‘ग्यानबा - तुकाराम’ हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? या लेकुरवाळ्या अभंगातूनच मराठीचा गोडवा लक्षात येतो. पूर्वी स्त्रिया जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणतात. ओवी आणि अभंग हे लोकछंद पुढे महानुभावांनी आणि ज्ञानेश्वरांपासूनच्या संतकवींनीही मोठया प्रमाणात वापरला. ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा आरंभबिदू नसून तो एका साहित्यिक-सांस्कृतिक प्रक्रियेचा कळसबिंदू होता. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा संतांनंतर वि. वा. शिरवाडकर, कवी कुसुम्रागज, ना. सी. फडके, ग. दि. माडगूळकर, साने गुरूजी, जयंत नारळीकर,  वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, शिवाजी सावंत, अनिल अवचट, इरावती कर्वे, राम गणेश गडकरी, गंगाधर गाडगीळ, पु.ल. देशपांडे, अरूण कांबळे, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे, विश्‍वास पाटील, दुर्गा भागवत, बहिणाबाई, आदी लेखकांनी  साहित्यातून मराठी भाषा समृध्द केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्याकाळात भाषाशुध्दीची जोरदार मोहीम उघडली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामीण, दलित, आदिवासी अशा साहित्यप्रवाहांनी मराठीला नवे चैतन्य प्राप्त करून दिले. त्यानंतर भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही समस्त मराठीजनाची मागणी आहे. 

  ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे.  ‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर 1988मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते. सामाजिक अन्याय, विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होते.