होमपेज › Satara › मराठ्यांचे अक्राळ विक्राळ रूप : साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा 

मराठ्यांचे अक्राळ विक्राळ रूप : साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा 

Published On: Jul 25 2018 11:51AM | Last Updated: Jul 25 2018 1:46PMसातारा : प्रतिनिधी

साताऱ्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. मोर्चात जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मराठा बांधवांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जनसागर उसळला आहे. शांत आणि संयमितपणे काढलेल्या मोर्चेकऱ्यांची संख्या पाहून  बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली.

मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजच्यावतीने राज्यभर मूक मोर्चे  काढण्यात आले. पण, या आंदोलनाची दाखल घेऊन सरकारने ठोस निर्णय न घेता समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे पेटून उठलेल्या मराठा समाजाने ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरू केले. बुधवारी  साताऱ्यात मराठा समाजाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. दोन दिवसांपूर्वीच उत्स्फूर्तपणे बंदला  पाळण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला. 

जिल्हातील व्यावसायिकांनी सकाळपासूनच  दुकाने उघडली नाहीत. वाहतूक व्यवस्था ठप्प होती. जिल्हा प्रशासनाने पहिल्या पर्वाचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी मोर्चामार्गावरील चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिहाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलकांसाठी पोलिसांनी बॅरिगेट्स लावण्यात आल्या होत्या. 

राजवाडा येथून सुरू झालेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा,  जय शिवाजी जय भवानी, आरक्षण आमच्या हाकाचे नाही कोणाच्या बापाचे, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा, आदी  घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

हा मोर्चा मोती चौक-देवी चौक-कमानी हौद चौक-शाहू चौक मार्गे पोवई नाक्यावर आला. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाजबांधवांनी अभिवादन केले. त्यानंतर हा मोर्चा जिहाधिकारी कार्यालयावर आला. जिल्ह्यातून बरेच आंदोलक याठिकाणी सकाळी लवकर दाखल झाले  होते. या ठिकाणी आंदोलकांचा अक्षरशः जनसागर उसळला. यावेळी मराठा समाजातील बांधवानी तीव्र भावना व्यक्त केल्या.