Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Satara › सातारा : कृष्णा नदीत मराठा बांधवांचे अर्धजलसमाधी आंदोलन (Video)

सातारा : कृष्णा नदीत मराठा बांधवांचे अर्धजलसमाधी आंदोलन (Video)

Published On: Aug 03 2018 12:01PM | Last Updated: Aug 03 2018 12:06PMकराड : प्रतिनिधी 

कराड तालुका मराठा समाज भगिनींनी बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास दत्त चौकात प्रारंभ केला आहे. या आंदोलनानंतरही जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. त्याचबरोबर चाफळ येथील रोहन तोडकर या मराठा बांधवाचा नवी मुंबई येथील आंदोलनावेळी निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आठवडा उलटून गेला तरी अद्यापही पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेण्यात अपयशच आले आहे. तसेच सात ते आठ मराठा बांधव, भगिनींनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्राणाचे बलिदान दिले. यानंतरही आराक्षणाच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे कराड तालुक्यातील मराठा बांधवांनी निषेध म्हणून कृष्णा व कोयना नदीच्या प्रीतिसंगमात उतरून निषेध व्यक्त केला.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता शासनाचा निषेध नोंदवत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. चाफळ परिसरातील रोहन तोडकरच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत मराठा बांधव नदीत उतरले. तसेच शासन चर्चेची टूम काढून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

 दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने केलेले दुर्लक्ष, तसेच  आरक्षणाबाबत झालेली बेताल वक्तव्ये यामुळे मराठा समाज संतप्त झाला असून आंदोलनास प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले राज्यभरातील गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्तता व्हावी,  कराड तालुका मराठा समाज बांधवांसह भगिनींचे तीन दिवसांपूर्वी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे. 

या घटनेमुळे तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.