Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Satara › आंदोलनादरम्यान साताऱ्यात एस.टी.वर दगडफेक

आंदोलनादरम्यान साताऱ्यात एस.टी.वर दगडफेक

Published On: Jul 24 2018 3:03PM | Last Updated: Jul 24 2018 3:03PMसातारा : प्रतिनिधी

मराठा मोर्चाच्या आंदोलनाला सातार्‍यात हिंसक वळण लागले असून सोमवारी रात्री उशीरा शिवशाही बसवर दगड फेकून त्याचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर सातारा शहरात ठिकठिकाणी बंद असून सकाळी वाढे फाटा येथे आंदोलकांनी सुमारे १५ मिनिटे रस्ता रोको केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करुन पोलिस व्हॅनमधून नेले.

सोमवारी मराठा मोर्चा आंदोलकाने जलसमाधी घेतल्यानंतर त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या सर्व घडामोडीनंतर सातार्‍यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस क्रमांक एमएच ०३ सीपी ५२१७ ही सातारकडे येत होती. ही बस वाढे फाटा ते जुना आराटीओ चौक येथे आल्यानंतर अज्ञाताने त्यावर दगडफेक केली. या घटनेत एसटीची काच फूटून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शिवशाहीचा बस चालक विजय आनंदराव जाधव (रा.ल्हासुर्णे, कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

साताऱ्यात महामार्ग रोखला 

मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांनी मंगळवारी दुपारी अकस्मातपणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली.

पंढरपुरातून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंदमधून सातारा जिल्हा वगळण्यात आला होता. महाराष्ट्रभर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मंगळवारी दुपारी मराठा आमदार, खासदारांसह इतर लोकप्रतिनिधींची बैठकही आयोजित करण्यात आलेली आहे.