होमपेज › Satara › पाटणमध्ये कडकडीत बंद

पाटणमध्ये कडकडीत बंद

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 10:04PMपाटण : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या मागण्यांकडे राज्य शासनाने कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ राज्याच्या विविध भागात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना पाटणमध्ये शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढत भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाज बांधवांनी दिला आहे.

शनिवारी सकाळपासूनच पाटण तालुक्यातील मराठा समाजातील बांधव पाटण शहरातील झेंडा चौकात जमा झाले होते. सकाळी 11 वाजता सर्व मराठा बांधवांनी मोर्चाने तहसील कार्यालयाकडे कूच केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मागण्या आमच्या हक्‍काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत,’ अशा  घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आला असता सर्वांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर संजय इंगवले, चंद्रहार निकम, सुरेश पाटील, दिनकर माथणे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या.

पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि तहसीलदार रामहरी भोसले यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे शांतते विसर्जन करण्यात आले. मोर्चा सर्वांच्या मुळे शांततेत पार पडला. मोर्चास पाटण तालुक्यातील शेकडो बांधव सहभागी झाले होते.