Fri, Aug 23, 2019 21:11होमपेज › Satara › 'दिशाभूल करू नका, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल'

'दिशाभूल करू नका, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर'

Published On: Aug 31 2018 1:50PM | Last Updated: Aug 31 2018 1:52PMकराड : प्रतिनिधी 

मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत.  शासनाकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना  फीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र त्याबाबत अंमलबजावणी होत नाही. जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली असता विसंगत उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा विद्यार्थ्यांना  फी मध्ये सवलत न देता अन्याय करणाऱ्या महाविद्यालयांवर काय कारवाई केली ? असा जाब विचारत मराठा समाज बांधवांनी कराडचे (जि. सातारा) प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यापुढे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

राज्य शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फी सवलत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. कराड तालुका मराठा बांधवांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी  श्वेता  सिंगल यांच्याशी चर्चा करून बैठक घेण्याची विनंती केली होती. मात्र ही बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे बैठक घेण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा दावा करत मराठा समाज बांधवांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यापुढे तीव्र आक्षेप नोंदवला.

प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. ही बैठक सोमवारी होण्याची शक्यता असून या बैठकीस कराड तालुका समाज बांधवांसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठा समन्वय समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात यावे. तसेच या बैठकीत सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच निर्णय घेण्याची क्षमता असणारे सक्षम संस्थाचालक यांनाही निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे.