Tue, Jul 23, 2019 04:46होमपेज › Satara › सातारा : मराठा आमदारांनी राजीनामे द्यावेत (Video)

आरक्षण मंजूर करून आणा; अन्यथा राजीनामे द्या

Published On: Jul 20 2018 2:41PM | Last Updated: Jul 20 2018 3:10PMसातारा : प्रतिनिधी

नागपूर येथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सध्याचे सरकार चालढकल करत आहे. सरकारकडून नुसते पोकळ आश्‍वासन दिले जात आहे. राज्यातील 142 मराठा आमदारांनी बघ्याची भूमिका न घेता मराठा आरक्षण मंजूर करून घ्यावे. जर ते होत नसेल तर आमदारकीचे राजीनामे द्यावेत, असा सज्जड इशारा सातारा मराठा क्रांती मोर्चा समितीच्यावतीने देण्यात आला. दरम्यान, भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या घरासमोरच तृतीयपंथीयांना नाचवणार असल्याचा  इशाराही यावेळी देण्यात आला.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताराच्या समितीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  बेमुदत ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सध्याचे सरकार हे फक्त पोकळ घोषणा देत असून लबाड बोलण्यात पटाईत झाले आहे. मराठ्यांच्या भावनेचा सरकारकडून फक्त छळ सुरू आहे. आमचा अंत पाहू नका नाहीतर उद्रेक होईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला. सध्या अधिवेशन सुरू आहे. त्यात राज्यातील एकूण आमदारांपैकी 142 आमदार मराठा आहेत. ते मराठा आरक्षणाचा विषय न घेता पुतण्या-काकांचे प्रेम दाखवत बसले आहेत. त्यांनी ही नौटंकी बंद करून मराठा आरक्षणाविषयी आवाज उठवून सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. नाहीतर आमदारकीचे राजीनामे द्यावेत. कसे आरक्षण मिळत नाही आम्ही बघतो, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. 

कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे 58 मोर्चे निघाले. त्यानंतर आता हे दुसरे पर्व सुरू झाले तरी मराठा मोर्चातील एकही मागणी शासनाने गेल्या 11 महिन्यात मान्य केलेली नाही. बिंदू नामावली नोंद वहीत बेकायदेशीर खुल्या प्रवर्गातील जागा अतिरिक्त केल्या आहेत. त्यामध्ये दुरूस्ती करेपर्यंत कोणतीच नोकर भरती करण्यात येवू नये, या नोकर भरतीपूर्वी सर्वसाधारण संवर्गातील शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या पदोन्नती दिल्यास ज्या जागा रिक्त होतील, त्या जागांवर नवीन नोकर भरती करावी. शासनाने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करताना जुनी 11 वी, 12 वीमधील प्रवेश फी अन्य समाज बांधवांना 50 रूपये आकारली आहे. मात्र हीच फी मराठा वर्गातील मुलांना 360 व 390 रूपये अशी सात ते आठ पटीने आकारली आहे.  मराठा बांधव हे जन्मताच सोबत खजिना घेवून येत नाहीत. अशा पध्दतीने भेदभाव केल्याने विद्यार्थी दशेपासूनच जातीय बीज पेरण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. इतर घटकांना जी प्रवेश फी आकारण्यात येते तशीच मराठा समाजासाठी आकारण्यात यावी, अशा मागण्या यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आल्या.

कोणतेही आंदोलन असल्यास त्याला हिंसक वळण दिल्यास लगेच तोडगा निघतो. आम्ही 11 महिने शांततेत राहिलो, आता शांत बसणार नाही. 15 ऑगस्टपूर्वी या संदर्भात शासनाने याच अधिवेशनात अध्यादेश काढून राज्यात प्रवेशासाठी मराठा समाज बांधवांची होणारी कोट्यवधी रूपयांची लूट थांबवली नाहीतर पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला. 

शांततेच्या मार्गाने आत्तापर्यंत मराठा बांधवांनी आंदोलने केली. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे मराठा बांधवांमध्ये खदखदत असलेला असंतोष उफाळून येईल. जिल्ह्यात मराठा बांधव आक्रमक झाल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहिल, असेही मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. 

यावेळी शरद काटकर, हरिष पाटणे, सतीश चव्हाण, राजू भोसले, अविनाश कदम,  शेखर मोरे, संजय पाटील, राहुल शिंदे, आनंदराव कणसे, बाळासाहेब महामुलकर, नितीन शिंदे, शरद जाधव, बापू क्षीरसागर, वैभव शिंदे, संदीप पोळ,  शिवाजीराव काटकर, अ‍ॅड. उदय शिर्के, प्रशांत नलावडे, प्रशांत निंबाळकर, विशाल महाडिक, चरण गायकवाड,  शितोळे, राजेशिर्के, रवी पवार, आदी मराठा बांधव उपस्थित होते.