Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Satara › कृष्णेत मराठा बांधवांची अर्धजलसमाधी

कृष्णेत मराठा बांधवांची अर्धजलसमाधी

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 11:33PMकराड : प्रतिनिधी

कराड तालुक्यात मराठा भगिनींनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर तीन दिवसानंतरही जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने शुक्रवारी दुपारी आठ मराठा समाज बांधवांनी कराडमधील कृष्णा नदीत उतरून अर्धजलसमाधी आंदोलन केले. जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः कराडातील आंदोलनस्थळी भेट देण्याची ग्वाही दिल्यानंतर सुमारे अर्धा तासाने आंदोलन मागे घेत मराठा समाजबांधव नदीतून बाहेर आले.

कराडातील मराठा भगिनींनी आंदोलन सुरू केल्यानंतर नायब तहसीलदार मिनल भोसले यांच्या व्यतिरिक्त पोलिस अधिकारी वगळता अन्य कोणाही प्रशासकीय अधिकार्‍यांनी दखल घेतलेली नाही. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेता मुख्यमंत्री चर्चेचे गुर्‍हाळ सुरू करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय रोहन तोडकर यांच्या मारेकर्‍यांचा अद्यापही शोध घेण्यात आलेला नाही. राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजातील बांधवांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून ते मागे घेण्याची मागणी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे गुन्हे मागे घेत मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत या मागणीसाठी मराठा समाज बांधव कराड - विटा मार्गालगतच्या कृष्णा पुलानजीक कृष्णा नदीत उतरले. 

आठ मराठा बांधवांनी गनिमी काव्याने नदीत उतरून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार राजेंद्र शेळके पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. सर्जेराव गायकवाड, नवनाथ ढवळे यांच्यासह प्रांताधिकार्‍यांनी आंदोलकांना नदीतून बाहेर येण्याचे आवाहन केले. जवळपास 10 मिनिटांच्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याशी प्रांताधिकार्‍यांच्या मोबाईलवरून मराठा बांधवांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कराडमध्ये आंदोलनस्थळी येण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंदोलक नदीतून बाहेर आले. त्यानंतर तणावाची स्थिती निवळली.

शासनाला आणखी किती बळी पाहिजेत?
मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत शासन गंभीर नाही. आजवर राज्यभरात आठ ते दहा समाज बांधवांसह भगिनींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळेच शासनाला आणखी किती बळींची प्रतिक्षा आहे ? असा प्रश्‍न उपस्थित करत मराठा समाज बांधवांनी भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा सज्जड इशाराही यावेळी दिला.