Thu, Jul 18, 2019 17:20होमपेज › Satara › लग्नाचे साहित्य आणताना वरपित्याचा अपघातात मृत्यू

लग्नाचे साहित्य आणताना वरपित्याचा अपघातात मृत्यू

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 10 2018 1:16AMवेणेगाव : वार्ताहर 

मुलाच्या लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी जात असताना ‘भाऊ दा ढाबा’ येथे वळणावर लक्झरी बस व दुचाकीचा बुधवारी दुपारी 1 वाजता अपघात झाला. या अपघातात भीमराव दत्तू घाडगे यांचे निधन झाले. भीमराव यांच्या मुलाचे दि. 11 रोजी लग्न आहे. मात्र, त्यापूर्वी भीमराव यांच्यावर काळाने घाला घातल्याने कामेरी व खोजेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी लक्झरी बसचालक सागर श्रीरंग जाधव (वय 28, रा. जळगाव, ता. कोरेगाव) यांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भीमराव घाडगे यांच्या मुलाचे लग्न 11 मे रोजी कामेरी येथे होणार आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सातारा येथे दुचाकीवरून खरेदीसाठी निघाले होते. त्याचवेळी एक लक्झरी बस (क्रमांक एम. एच. 11 टी. 9419) लग्नाचे वर्‍हाड घेऊन जात होती. ही बस भाऊ दा ढाब्याच्या समोर आल्यानंतर वळण घेत असताना बस व दुचाकीचा अपघात झाला. 

अपघातात भीमराव घाडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक सागर जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
एकुलता एक मुलगा निलेश याचे लग्नाचे साहित्य आणण्यासाठी निघालेल्या पित्यावर काळाने घातला. यामुळे कामेरीसह खोजेवाडी परिसरात शोककळा निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती. तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए.खान करीत आहेत.