Wed, Aug 21, 2019 19:05होमपेज › Satara › पतीचा भाजून मृत्यू; पत्नी गंभीर

पतीचा भाजून मृत्यू; पत्नी गंभीर

Published On: May 10 2018 2:01AM | Last Updated: May 10 2018 1:12AMकराड : प्रतिनिधी

झोपडीला लागलेल्या आगीत पतीचा भाजून मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथे झोपडीत लावलेल्या दिव्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची माहिती न मिळाल्याने पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगणे यांच्या मदतीने त्यांच्यांवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.


रामू पवार (पूर्ण नाव माहीत नाही. वय 50, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. वस्ती साकुर्डी, ता. कराड) असे झोपडीला लागलेल्या आगीत जळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पत्नी उज्ज्वला रामू पवार (वय 45) या भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, वस्ती साकुर्डी येथील डोंगरी माळ नावाच्या शिवारात गेल्या तीन महिन्यांपासून रामू पवार व उज्ज्वला पवार हे झोपडीमध्ये राहत होते. या झोपडीला असलेला कूड हा उसाच्या पाल्यापासून व चिपाडापासून बनविलेला होता. दोघेही भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करत होते. रामू पवार हे दिव्यांग असल्याने त्यांची शारिरीक हलचाल अतिशय मंदगतीने होत होती. त्यातच त्यांना दारुचेही व्यसन होते. रविवार दि. 6 रोजी रात्री रामू पवार व त्यांच्या पत्नी उज्ज्वला हे दोघेही जेवण करून झोपडीत दिवा लावून झोपले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली. दिव्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उज्ज्वला जाग्या झाल्या. त्यांनी आरडाओरडा करत झोपडीतून बाहेर पळ काढला. मात्र, रामू पवार यांना झोपडीतून बाहेर पळता आले नाही. त्यातच झोपडीला असलेल्या पाल्याने पेट घेतल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. पती झोपडीत अडकल्याचे लक्षात येताच उज्ज्वला यांनी त्यांना धारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची झळ बसल्याने उज्ज्वला यांच्या हाताला व पायाला भाजून त्या गंभीर जमखी झाल्या. तोपर्यंत परिसरात असलेल्या झोपडीतील व घरातील लोक तेथे जमा झाला. त्यांनी पाणी आणून आग विझवली. तोपर्यंत फार उशीर झाला होता. कारण झोपडीला लागलेल्या आगीत रामू पवार यांचा भाजून जाग्यावरच मृत्यू झाला होता. 

ही बाब काही ग्रामस्थांनी कराड तालुका पोलिसांना कळवली. पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घाडगे, बीट अंमलदार फरांदे व पोलिस हवालदार संग्राम फडतरे यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी उज्ज्वला पवार यांना उपचारसाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. तर रामू पवार यांच्या मृत्यूचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला.