Fri, May 29, 2020 18:30होमपेज › Satara › लोकसभा की विधानसभा? पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

लोकसभा की विधानसभा? पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

Published On: Sep 29 2019 5:18PM | Last Updated: Sep 29 2019 5:40PM

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.कराड : प्रतिनिधी

कराड दक्षिणच्या जनतेने १९९१ पासून आजवर मला प्रेम दिल्यानेच मी इथेपर्यंत आलो आहे. मी कुठेही जाणार नाही. मी पक्ष नेतृत्वाला माझी भूमिका सांगितली आहे. आज (ता.२९) कराडमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून मी येत्या एक ते दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कराड दक्षिणमधील बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री आ. राजेंद्र मुळक यांच्यासह कराड दक्षिणसह जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही ऐतिहासिक लढाई असून पक्ष आणि देश संकटात सापडला आहे. सत्तेचा आणि पैशाचा एवढा दुरूपयोग आपण आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे या सरकारला हाकलण्याची आवश्यकता असून या क्रांतीची सुरूवात कराडपासून व्हावी, असे आवाहनही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

भाजपाकडून साम, दाम, दंड, भेद ही निती वापरली जात असल्याचे सांगत खा. शरद पवार यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून भाजपवर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली. ११ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो ? असा प्रश्‍न उपस्थित करत २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचारांचे पुरावे जनतेला दाखवा असे आव्हान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस मेळाव्यात बोलताना राज्य शासनासह केंद्र सरकारवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली. २००८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला होता. २०१४ साली त्या निर्णयात चुकीचे झाल्याची कुजबूज सुरू झाली आणि २०१६ याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. यात चिदंबरम यांचे नाव नव्हते, असा दावा करत २०१९ साली निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आली.

त्यांना तुरूंगात सतरंजीवर झोपायला भाग पाडले जाते. डाळ नसलेली आमटी खायला दिली जाते. चपात्याही खाण्या योग्य नसतात. त्यांना जामिनही मिळू दिला जात नाही. ते काय देश सोडून पळून जाणार आहेत का ? ते काय खुनी आहेत का ? असे प्रश्‍न उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली. तसेच कर्नाटकचे डी. के. शिवकुमार यांच्यासह अन्य नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. कराडात अविनाश मोहिते यांनाही तीन महिने तुरूंगात काढावे लागले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

खा. शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य करताना पोलिसांनी न्यायालयात ११ हजार कोटींच्या राज्य बॅकेंच्या ठेवी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो ? असा प्रश्‍न उपस्थित करत मला तुरूंगात जावे लागले तर आश्‍चर्य वाटणार नाही. मी तुरूंगात वाचण्यासाठी पुस्तके आणा असे सांगूनही ठेवले आहे, असा उपरोधिक टोला लगावत आपल्यावरही ईडीकडून कारवाई होऊ शकते, अशी भीतीही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.