Sat, Jul 11, 2020 22:38होमपेज › Satara › तरुणांना महाबळेश्‍वरच्‍या जंगलातील पार्टी भोवली (व्हिडिओ)

तरुणांना महाबळेश्‍वरच्‍या जंगलातील पार्टी भोवली (व्हिडिओ)

Published On: Dec 21 2017 3:48PM | Last Updated: Dec 21 2017 3:50PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाबळेश्‍वरपासून जवळच असलेल्या लिंगमळा धबधब्याजवळील घनदाट जंगलात पार्टी करणे, तरुणांना चांगलेच भोवले आहे. बुधवारी रात्री सुरू असलेल्या पार्टीवर वनविभागाने रात्री नऊ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्यांपैकी आठ जणांना आज (गुरुवार) महाबळेश्‍वर न्यायालयात हजर केले आहे. हे तरुण मिरज, नगर आणि मुंबई येथील उद्योजकांची मुले आहेत. पाचगणीतील एका शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. 

'लिंगमळ्याच्या धबधब्याच्या पार्किंगमध्ये दिव-दमण पासिंगची दोन वाहने तसेच 'एमएच-१६' पासिंगचे एक वाहन उभे आहे. या वाहनातील पर्यटक धबधब्यातून परत आलेले नाहीत' अशी माहिती आरएफओ रणजित गायकवाड यांनी बुधवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी महाबळेश्‍वर पोलिसांना कळवली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहिम राबवली. मात्र, हे पर्यटक कुठेही सापडले नाहीत. 

यामुळे पोलिसांनी महाबळेश्‍वर येथील रेस्क्‍यू ऑपरेशनच्या साहित्यासह महाबळेश्‍वर ट्रेकर्स ग्रुप आणि सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप अशा १६ जणांच्या पथकाने लिंगमळा जंगल परिसरात शोधमोहिम हाती घेतली. या पथकास जंगलात नऊ तरुण आढळले. गायकवाड यांनी त्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अपप्रवेश नियमांतर्गत कारवाई केले. 

यात आकाश महाबळ (वय २३, मिरज), संभाजी गाडे (वय २४, नगर), हर्षल पटेल (वय २४, मुंबई), हेमचंद्र शहा (वय २४, मुंबई), प्रियंक पटेल (वय २५, मुंबई), ऋषिकेश गाडे (वय २४, नगर), शुभम जिने (वय २४, नगर), उमंग पटेल (वय २४, मुंबई), चांद पटेल (मुंबई) या तरुणांना पोलिसांनी महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. या तरुणांनी मादक पदार्थांचे सेवन केले आहे का, याची तपासणी रुग्णालयात करण्यात आली. यापैकी आठ तरुणांनी मद्यार्काचे सेवन केले होते; पण ते मद्यार्कांच्या अंमलाखाली नव्हते, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. या तरुणांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम ११०-११७ अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यांना आज महाबळेश्‍वरच्या न्यायालयात हजर करण्‍यात आले.