Mon, Apr 22, 2019 11:57होमपेज › Satara › महाबळेश्‍वर पालिकेने राबवलेले उपक्रम स्तुत्य

महाबळेश्‍वर पालिकेने राबवलेले उपक्रम स्तुत्य

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:20PM

बुकमार्क करा
महाबळेश्‍वर : वार्ताहर

महाबळेश्‍वरची सर्वांत स्वच्छ पर्यटनस्थळ अशी देशभरात ओळख व्हावी, अशा रितीने पालिकेचे प्रयत्न सुरु असून आपण राबवलेले उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी व्यक्त केले. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महाबळेश्‍वर नगरपरिषदेची पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, नगरविकासचे अव्वर सचिव सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते.
महाबळेश्‍वर नगरपरिषदेची पूर्वतयारी व राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर  मनीषा म्हैसकर पुढे म्हणाल्या,

स्वच्छ सर्वेक्षणसाठी महाबळेश्‍वर पालिकेचे काम खूप चांगल्या पद्धतीने सुरु असून सिटीजन फिडबॅक वाढवणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडतो याकडे लक्ष द्या. नगरपरिषदेची पेपर बॅग ही संकल्पना स्तुत्य असून महिला बचतगटाच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगारदेखील मिळत आहे व पर्यावरणपूरक अशी पेपर बॅग ही संकल्पना सर्वच शहरांनी राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. 
स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी पालिकेने तयार केलेली चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. तद्नंतर पालिकेमध्ये स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते मनीषा म्हैसकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते. अमिता दगडे-पाटील यांनी स्वच्छ सर्वेक्षणसाठी पालिकेने राबवलेल्या विविध कार्यक्रमाची अभियानाची सविस्तर माहिती दिली. स्वप्नाली शिंदे यांनी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पालिकेने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून पालिका देशात अव्वल ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.