Thu, Jul 18, 2019 02:57होमपेज › Satara › लुंगी डान्सप्रकरणी पोलिस निलंबित

लुंगी डान्सप्रकरणी पोलिस निलंबित

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:52PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये सुरुची राडा प्रकरणातील संशयित आरोपींंनी केलेल्या लुंगी डान्सचे प्रकरण सर्वात प्रथम ‘पुढारी’ने बाहेर काढल्यानंतर  राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बंदोबस्तावर असलेले हवालदार अनिल परशुराम रजपूत यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले. आणखी तीन पोलिसांची चौकशी सुरू असून, हे तीनही पोलिस कर्तव्याच्या ठिकाणी हजर नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दरम्यान, लुंगी डान्स प्रकरणाचा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रिझन वॉर्डमध्ये संशयित आरोपींनी बिनधोकपणे  गाण्यांच्या ठेक्यात लुंगी डान्स केला.  याबाबतची  क्‍लिप ‘पुढारी’ला मिळताच ‘पुढारी’ने ती लोकांसमोर आणली. याबाबतचे वृत्तही सर्वप्रथम ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले. या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी पोलिसांनी छापा टाकून प्रिझन वॉर्डमधून मोबाईल, पॉवर बँक, कॅरम अशा वस्तूही जप्‍त केल्या.

संशयित आरोपींकडे मोबाईलसह विविध वस्तू सापडल्याने त्या पोलिस बंदोबस्त असतानाही आत कशा गेल्या, असा सवाल दै. ‘पुढारी’ने उपस्थित केला होता. याचीही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत सोमवारी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर प्रिझन वॉर्डबाहेर बंदोबस्तासाठी असणारे पोलिस संशयाच्या भोवर्‍यात सापडले. प्राथमिक चौकशी सुरू असताना यामध्ये बंदोबस्तावरील पोलिस अनिल रजपूत दोषी आढळल्याने त्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. रजपूत यांच्याबरोबर पोलिस हवालदार एस. डी. पवार, व्ही. एस. साळुंखे, यू. एस. शिंदे यांचीही नियुक्‍ती बंदोबस्तासाठी होती; मात्र धक्‍कादायक बाब म्हणजे यातील इतर तिन्ही पोलिस कर्तव्य बजावण्यासाठी त्या ठिकाणी नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे त्या तिघांचीही प्राथमिक चौकशी सुरू आहे. 

दरम्यान, लुंगी डान्सप्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांना अहवाल तयार करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी अहवाल तयार केला असून, तो बुधवारी जिल्हा न्यायालयात सादर केला जाणार आहे. या अहवालाबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे.

खासदार समर्थकांना उच्च न्यायालयात तात्पुरता जामीन

सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी खा.  उदयनराजे भोसले यांच्या अकरा समर्थकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून, याची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी खासदार गटाने प्रथमच अर्ज केला असून, तो अर्ज मंजूर झाल्याने आमदार समर्थकांनंतर आता खासदार समर्थकहीसाडेतीन महिन्यांनंतर प्रथमच सातार्‍यात दिसणार आहेत.

तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेल्यांमध्ये पंकज चव्हाण, रूपेश सपकाळ, विकी यादव, दीपक धडवई, युवराज शिंदे, सनी भोसले, विवेक जाधव, अमोल हादगे, अमर आवळे, सुजित आवळे, सनराज साबळे अशी त्यांची नावे अहेत. आनेवाडी टोल नाक्यावरून सातार्‍यातील सुरुची येथे खासदार व आमदार गटांमध्ये तोडफोड, जाळपोळ व फायरिंगसह जोरदार राडा झाला. दोन्ही गटांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकूण तीन तक्रारी दाखल झाल्या. गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली, तर बहुतांश जण पसार झाले. जे खासदार समर्थक पसार झाले होते, त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला; मात्र जिल्हा न्यायालयाने तो फेटाळल्याने त्यांनी दि. 22 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर त्याबाबतची सुनावणी झाली असता, संशयितांना 7 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला. या प्रकरणासाठी अ‍ॅड. अशोक मुंदरगी व अ‍ॅड. शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले.