Tue, Sep 25, 2018 11:27



होमपेज › Satara › लव्ह जिहाद पदयात्रेसाठी उपोषण(व्हिडिओ)

लव्ह जिहाद पदयात्रेसाठी उपोषण(व्हिडिओ)

Published On: Jan 19 2018 7:25PM | Last Updated: Jan 19 2018 7:25PM



कराड : प्रतिनिधी

लव्ह जिहाद पदयात्रेला परवानगी मिळेपर्यंत कराडमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. हिंदू एकता आंदोलन समितीचे प्रांताध्यक्ष, कराडचे नगरसेवक विनायक पावसकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण करणार असल्‍याचे सांगितले. 

शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कराड ते सातारा अशी लव्ह जिहाद पदयात्रा काढण्यात येणार होती. मात्र, या पदयात्रेस सातारा पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पावसकरांनी हा निर्णय घेतला आहे. पदयात्रेला परवानगी मिळेपर्यंत कराडमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण करणार असल्याचे पावसकर यांनी पत्रकार परिषद शुक्रवारी जाहीर केले.

पावसकर म्‍हणाले, ‘‘काही लोकांच्या दबावाखाली पोलिसांनी पदयात्रेला परवानगी नाकारली आहे. हिंदू एकता आंदोलन समिती हिंदू धर्मासाठी गेली चाळीस वर्षे काम करते. पदयात्रा हिंदू समाजातील माता-भगिनींच्या रक्षणासाठी काढण्यात येणार होती.  त्यामुळे आम्ही आमच्या समाजातील माता-भगिनींचे रक्षण करायचे की नाही?’’ असा संतप्त प्रश्न उपस्थित करत पावसकर म्‍हणाले, ‘‘आम्ही कायदा मानणारे लोक आहोत. त्यामुळे उद्यापासून आम्ही कराड मधील दत्त चौकात लाक्षणिक उपोषण सुरू करणार आहोत. हे उपोषण सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल. त्यामुळे आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे. मात्र, सायंकाळपर्यंत परवानगी न मिळाल्यास आम्ही हे उपोषण पदयात्रेला परवानगी मिळेपर्यंत सुरू ठेवणार आहे.’’