Tue, Feb 19, 2019 15:02होमपेज › Satara › वन्यजीवांची तहान भागवणार माणुसकीचे झरे

वन्यजीवांची तहान भागवणार माणुसकीचे झरे

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:35PMलोणंद : शशिकांत जाधव

वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे-झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशु-पक्षांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे रंगपंचमी उत्सवी लाखो लिटर पाणी वाया न घालवता लोणंद शहरात व परिसरात विविध ठिकाणच्या वृक्षांवर व जमिनींवर पशुपक्षांसाठी चारा व पाणवठे उभारुन पशुपक्षी वाचवा, निसर्ग वाचवा असा संदेश लोणंदच्या साथ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे वतीने दिला आहे.

पूर्वी शेकडो जातीचे पशुपक्षी पहावयास मिळायचे. पक्ष्यांच्या किलबिलीने प्रसन्न वाटायचे. मात्र, सध्या परिस्थिती उलट होऊन बसली आहे. मानवी संस्कृतीत पिंडाला शिवणारा कावळाही दुर्मीळ होऊन बसला आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी सर्व सुख-सुविधा जागेवरच उपलब्ध करून घेतल्या. मात्र मुक्या पशु-पक्षांचे काय? असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण भागात विहिरी, झाडे, अडगळीच्या खोल्या आदींमध्ये सुगरणीने विणकाम केलेली घरटी आढळून येतात. मात्र, ही विणकाम केलेली घरटी पक्षांविना रिकामी आहेत.  शासनाने ठरवून दिलेल्या जागतिक चिमणी दिनाला अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये आदींनी भरभरून प्रतिसाद देतात. यामध्ये पक्षांना धान्य-पाणी देवून हा दिन साजरा करण्यात येतो. मात्र, चिमणी बचावाच्या एका दिवसाने दुर्मिळ झालेली चिमणी पुन्हा दिसणार नाही, हे तेवढेच खरे आहे. त्यासाठी जागृती होऊन प्रत्येकानेच याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

उन्हाच्या चटक्याने सध्या वन्यजीव, पशु-पक्षांची भटकंती सुरु झाली आहे. कुणी पाणी देता का पाणी? अशी आर्त हाक मारणार्‍या मुक्या जीवांना आता पाणवठे, थोडे धान्य देण्याची गरज आहे. सर्व सामाजिक संघटनांनी अशा पशुपक्षांसाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. पुस्तकातील निर्जीव चिऊ-काऊला प्रत्यक्षात पाहण्यासाठी आताच्या डिजिटल युगातील चिमुरड्यांना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे. निसर्गातील या जीवांना चारा व पाणी देवून जगवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्या हेतुनेच चारा व पाणवठ्यांची उभारणी साथ प्रतिष्ठान चे कय्युमभाई मुल्ला, गजेंद्र मुसळे, मंगेश माने, रोहित शेलार, दिपक बाटे, मयुर चव्हाण, अजित घोलप, दत्ता माने आदींनी केली आहे.