Tue, Jul 23, 2019 06:44होमपेज › Satara › लोणंदमध्ये चक्क सत्ताधारी नगरसेवकांचे उपोषण

लोणंदमध्ये चक्क सत्ताधारी नगरसेवकांचे उपोषण

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 10:44PM

बुकमार्क करा
लोणंद : प्रतिनिधी

लोणंदच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके-पाटील व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी जनरल बॉडी सभेत न झालेले ठराव लिहीत असून त्यावर नगरसेवकांचे मत नोंदवून न घेता संगनमताने मनमानी कारभार करत असल्याच्या निषेधार्थ सत्तेत असणार्‍या उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके यांच्यासह  राष्ट्रवादी व भाजपच्या 7 नगरसेवकांनी जनरल बॉडी सभेतून सभात्याग करत नगरपंचायतीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्याला विविध राजकीय पक्ष व संघटनांनीही पाठींबा दिला. 

लोणंदच्या नगराध्यक्षांनी दि. 9 रोजी नगरपंचायतीची सर्वसाधारण  सभा  बोलावली होती. सभा सुरू झाल्यानंतर मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत कायम करण्याचा विषय होता. हा ठराव मंजूर करण्यावेळी गतसभेत जे ठराव झाले नाहीत ते घेण्यात आले आहेत, वाटल्यास व्हीडीओ सीडी पहा, असे नगरसेवकांनी सांगीतले व उपसुचना दिली. त्यावर मुख्याधिकारी यांनी कोणताही अभिप्राय दिला नाही. उपसुचना मतावर घेण्यास सांगितले असता नगराध्यक्षांनी कोणता ठराव करायचा व कोणता नाही हे आम्ही ठरवणार, असे सांगून सभागृहात मतच मांडुन दिले नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. 

या प्रकारानंतर उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, बांधकाम सभापती दिपाली क्षीरसागर, पाणी पुरवठा सभापती किरण पवार, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, कुसुूम शिरतोडे, कृष्णाबाई रासकर या 7 नगरसेवकांनी  सभात्याग करून नगरपंचायतच्या समोर एक दिवसाच्या लाक्षणीक उपोषणास सुरुवात केली. 

सर्वसाधारण सभेत काही विषयांचे ठराव झालेले नसताना ठराव घेतले जात आहेत, सुचक, अनुमोदक अध्यक्षांच्या सोयीने लिहले जात आहे, मुख्याधिकारी यांची भुमिका संशयास्पद आहे. यातून गैरकारभार सुरू आहे, याची माहिती दिली जात नाही. मुख्याधिकारी कुणाच्या दबावाखाखाल काम करतात, हे जनतेला समजले पाहिजे, अशी मते सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली. आंदोलनाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर, विश्‍वास शिरतोडे, अ‍ॅड. सुभाष घाडगे, राजू खरात, डॉ. नितीन सावंत, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, रवींद्र क्षीरसागर, जयेश कुदळे, दिपीका घोडके, रोहिणी कानडे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.