Sun, Aug 25, 2019 23:37होमपेज › Satara › माऊलींच्या प्रस्थानाने लोणंदवासीयांना हुरहुर

माऊलींच्या प्रस्थानाने लोणंदवासीयांना हुरहुर

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:15PM लोणंद : शशिकांत जाधव  

‘ज्ञानेश्‍वर माऊली तुकाराम’ अशा जयघोषाने व टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेलेल्या वातावरणात माऊलींच्या सोहळ्याला लोणंदवासीयांनी भक्तीमय निरोप दिला. माऊलींच्या प्रस्थानाने स्थानिकांना मात्र हूरहूर लागून राहिली. 

माऊलींचा मुक्काम असलेल्या लोणंद पालखी तळावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. एकच मुक्काम असल्याने भाविकांची गर्दी ओसंडून वाहिली.  माऊलींची नित्य पूजा, आरती झाल्यानंतर पहिला भोंगा साडेबाराच्या सुमारास वाजविण्यात आला. पालखी तळावर भगवी पताका, वीणा, मृदंग, टाळ घेतलेले व पांढरा शुभ्र शर्ट, धोतर, लेंगा, गळ्यात उपरणे, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गोपीचंद टिळा लावलेले वारकरी दाखल होत होते. दुपारी एकच्या सुमारास माऊलींच्या पालखीने लोणंदमधून प्रस्थान ठेवले. 

एकच्या सुमारास लोणंदच्या पालखी तळावरून सुमारे शंभर मीटर अंतर माऊलींची पालखी गावकर्‍यांनी खांद्यावर घेतली. त्यापुढे नवी पेठे येथील छ. शाहू चौकात रथात पालखी ठेवण्यात आली. विविध रंग व प्रजातीच्या फुलांनी सजवलेला रथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. पालखी सोहळ्यात सर्वात पुढे सनई चौघडा असलेली बैलगाडी, मागे माऊली व चोपदाराचा अश्‍व होता. त्यामागे रथापुढील सत्तावीस दिंडीतील वारकरी ‘माऊली, माऊली, माऊलीं’ चा जयघोष करत निघाले होते. लोणंद नगरीतून पालखी सोहळा जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी गर्दी केली होती. हा पालखी सोहळा गांधी चौक, शास्त्री चौक, स्टेशन चौक, नीरा चौक मार्गे फलटण पुलावरून पोलिस स्टेशनसमोरून सरहदेच्या ओढयापुढे फलटण तालुक्यात मार्गस्थ झाला. माऊलींच्या निरोपाने लोणंद नगरीतील वातावरण सुनेसुने झाले होते.