Fri, Jun 05, 2020 11:51होमपेज › Satara › उदयनराजेंविरोधात की विधानसभेच्या रिंगणात? पृथ्वीराज चव्हाण उद्या ठरवणार

उदयनराजेंविरोधात की विधानसभेच्या रिंगणात? पृथ्वीराज चव्हाण उद्या ठरवणार

Published On: Sep 28 2019 7:59PM | Last Updated: Sep 28 2019 7:59PM
सातारा : प्रतिनिधी

आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा कराडसह संपूर्ण राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (ता.२९) दुपारी कराडमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवणार की लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, हे जाहीर करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून पृथ्वीराज चव्हाण अथवा माजी खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणूक रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला याबाबत ऑफरही दिल्याची चर्चा सुरू असून दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चाही झाली आहे.

या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांच्याविरूद्ध पृथ्वीराज चव्हाण हे पोटनिवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. याठिकाणी मागील विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने बंडखोरी केली होती.

सध्यस्थितीतही विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर हे काँग्रेसमधून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. मात्र काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास त्यांची बंडखोरी अटळ आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतरही माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसपासून फारकत घेतलेली नाही. राज्यासह सातारा जिल्ह्यात अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना कराड दक्षिणमध्ये बंडखोरी टाळत निष्ठावंत नेत्यांचे पुनर्वसन कसे करायचे? असा प्रश्न काँग्रेस नेतृत्वापुढे निर्माण झाला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफरनंतर हा गुंता सोडवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यास पक्ष नेतृत्वाकडून सांगितल्याची चर्चा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण यांनीही शरद पवार यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत उभे रहावे, अशी मागणी यापूर्वीच केली आहे.  मात्र शरद पवार यांनी यास नकार दिला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधूनच निवडणूक लढणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा होत आहे.

या मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण हे कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ? हे आज स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मेळाव्यात काय निर्णय होणार ? याकडे लागले आहे.