होमपेज › Satara › सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या पथ्यावर 

सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या पथ्यावर 

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 9:59PMरेठरे बु : दिलीप धर्मे

रेठरे बु. ता. कराड ग्रामपंचायत निवडणुकीचा चांगला परिणाम दिसून आला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर अटी बरोबर ग्रामपंचायत थकीत कर भरणे अनिवार्य आहे. त्याचा फायदा कर वसुलीवर दिसून आला आहे.अर्जदाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात इच्छुक उमेदवारांनी थकीत करापोटीचे तब्बल 4 लाख रूपये भरले आहेत. या निमित्ताने कर वसूल झाला असला तरी अद्याप थकीत कर न भरणार्‍यांमध्ये गाव पुढारी म्हणवून घेणारांची संख्या अधिक आहे. 

मोठ्या ग्रामपंचायतीपैकी रेठरे बु. एक असून साधारणपणे वार्षिक एक कोटींचा कर जमा होत असतो. त्यापैकी या आर्थिक वर्षात मागील व चालू मिळून 40 टक्क्के वसूल  झाला  असून अजून 60 टक्के येणे बाकी आहे. ग्रामपंचायतीचे प्रतिमहिना लाईट बिल 75 हजार रूपये, कर्मचारी पगार एक लाख 30हजार रूपये, इतर खर्च 25 ते 30 हजार आहे. 

त्या प्रमाणात वसूल होत नसल्याने थकीतचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले आहे. त्यात सर्वसामान्य लोकांपेक्षा  गाव पुढार्‍यांची व प्रतिष्ठीत मंडळींची संख्या अधिक आहे. हा वसूल झाला नाही तर ग्रामपंचायत  अडचणीत येणार आहे. कृष्णा कारखान्याकडून गेली 2010 ते 2011 पासून अंशदान अनुदान ग्रामपंचायतीस मिळालेले नाही.ही बाब कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीचे थकीत देणे तात्काळ भागवले. 

सध्यातरी निवडणुकीचा चांगला परिणाम वसुलीवर झाला आहे.निवडणूक झाल्यावरही अशाच प्रकारे वसुली होणे गरजेचे असून कोण जवळचा कोण लांबचा हे न पाहता गावचा विकास व हिताचा विचार करून वसुलीवर भर दिला पाहिजे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.  कारण या वसुलीतून विकासकामे होत असतात. गावात सुविधा याच निधीतून उपलब्ध करता येतात.