Tue, Jun 02, 2020 01:57
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘याला पाडा अन् त्याला गाडा’ यातच गाजतोय माढा

‘याला पाडा अन् त्याला गाडा’ यातच गाजतोय माढा

Published On: Mar 17 2019 1:48AM | Last Updated: Mar 16 2019 9:54PM
हरीष पाटणे, सातारा

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच माढा मतदारसंघ कमालीचा गाजत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी असो की सेना-भाजपची महायुती असो, सर्वच राजकीय पक्षांमधील स्थानिक नेत्यांमध्ये असलेली दरी ‘याला गाडा, त्याला पाडा’ इथपर्यंत जाऊन पोहोचल्याने माढ्याची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.  पाडापाडीच्या व गाडागाडीच्या या खेळात दुष्काळी जनतेला विकासाचा काढा पाजणारा मसिहा मिळणे मुश्कील झाले आहे. 

पूर्वी पंढरपूर हा लोकसभेचा राखीव मतदारसंघ होता. 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत माढा या नव्या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला हक्काचा बारामती मतदारसंघ कन्या सुप्रिया सुळे यांना दिला आणि त्यांनी पुनर्रचित माढ्यात उडी घेतली. या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण-खटाव व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा, तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-माढा, सांगोला व माळशिरस या मतदारसंघांचा समावेश आहे. बेरकी पवारांनी अचूक गणित साधले आणि भाजपचे सुभाष देशमुख यांच्याविरोधात त्यांना 5 लाख 30 हजार 596 एवढी मते मिळाली. सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती. मात्र, 3 लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊनही पवारांकडून दुष्काळी तालुक्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत, हा त्यांच्यावर आरोप राहिला. माढ्याची बारामती करू, ही त्यांची घोषणाही घोषणाच राहिली. पवार राष्ट्रीय राजकारणात व्यग्र राहिले आणि माढ्याची जनता पाण्यासाठी धाय मोकलून रडू लागली. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत तर संपूर्ण देशभर मोदी  लाट होती. शरद पवारांनी आता आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा केली आणि पवार राज्यसभेवर गेले. पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा विजयसिंह मोहिते-पाटील यांना लढवायला भाग पाडले,  तर भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडली. या जागेवरून सदाभाऊ खोत हे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविरोधात लढले; तर विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली. विजयसिंह मोहिते-पाटील यांना 4 लाख 89 हजार 989, तर सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 एवढी मते मिळाली. विजयसिंह मोहिते-पाटील हे फक्त 25 हजारांनी निवडून आले. मात्र, मोदी लाटेत काँग्रेसचे पानिपत झाले असताना मोहिते-पाटलांचा विजय मात्र झळाळून गेला. 

2019 च्या आताच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरात माढा मतदारसंघ गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि मतदारसंघातील वातावरण अचानकच स्फोटक झाले. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. मुळातच शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी गेली दोन वर्षे हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पवारांच्या आशीर्वादावरच ते माढा मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेत होते. मोहिते-पाटील यांचे अंतर्गत विरोधकही प्रभाकर देशमुख यांचे नाव घेऊ लागले होते. कोरी पाटी म्हणून व अभ्यासू चेहरा म्हणून देशमुखांच्या नावाला मान्यता मिळवून देण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू झाले होते. 

मोहिते-पाटील यांच्या गटाला तेव्हाच दगाफटका होणार, याची जाणीव झाली होती. त्यामुळे संभाव्य डागडुजी लक्षात घेऊन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी  प्रभाकर देशमुख यांचे अंतर्गत विरोधक काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याशी संधान  साधले होते. 

माढा मतदारसंघात स्वपक्षातच अशा कलागती लावून पवारांनी भांडणे मिटवण्यासाठी म्हणून स्वत:च केलेली भीष्म प्रतिज्ञा मोडून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर म्हणून माढ्यातून लढण्याचा मनसुबा जाहीर केला. तसे वातावरण तयारही केले. मुळातच देशमुखांच्या फिरतीने आधीच बिथरलेला मोहिते-पाटील गट पवारांच्या घोषणेने आणखी बिथरला.  त्यातच चाचपणीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांचे होमपीच असलेल्या फलटणच्या मैदानावर पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. पवारांच्या माढ्याच्या एंट्रीला पहिल्या घासालाच खडा लागला तो तिथेच. नुसत्या डोळ्यांच्या इशार्‍यावर आपल्या सहकार्‍यांना चिडीचूप करणारे पवार कार्यकर्त्यांना थांबवू शकले नाहीत.  तेथेच पवारांचा माघारीचा निर्णय पक्का झाला होता. ‘माढा आणि पवारांना पाडा’ ही सोशल मीडियावर गाजलेली पोस्ट, मोहिते-पाटील गटाने उघडलेली मोहीम, विश्‍वासात न घेतल्याने माणचे आमदार जयकुमार गोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फलटणचे रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी उघडलेली आघाडी या सर्वच बाबी लक्षात घेऊन पवारांनी तरुणांना संधी देण्याचे कारण पुढे करत माढ्यातून माघार घेतली. 

पवारांच्या माघारीनंतर भाजप-शिवसेना व अन्य राजकीय पक्षांनी त्यांच्या विरोधात एकच आघाडी उघडली. ‘पवार घाबरले, मैदान सोडून पळाले, भाजपचा पहिला विजय’ अशा भुमका उठवल्या गेल्या. त्या अद्यापही सुरूच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पाठोपाठ एक, दोन याद्या जाहीर झाल्या; पण माढ्याचा तिढा काही सुटता सुटेना. राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. लढायला इच्छुक असलेले मंत्री सुभाष देशमुख हेही पवारांच्या माघारीनंतर अंदाज घेत आहेत. 

रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी माढ्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर वंचित बहुजन आघाडीने अ‍ॅड. विजय मोरे यांची उमेदवारी जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार निश्‍चित करता येत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्यावर कडी केली असून मतदारसंघ काँग्रेसला द्या, अशी मागणी करत हवा निर्माण केली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघ कमालीचा संवेदनशील झाला आहे. 

या मतदारसंघाची सध्याची राजकीय रचना मोठी गंमतीची आहे. करमाळ्याला शिवसेनेचे आ. नारायण पाटील, माढ्याला राष्ट्रवादीचे आ. बबनराव शिंदे, माळशिरसला राष्ट्रवादीचे आ. हणमंतराव डोळस, फलटणला राष्ट्रवादीचे आ. दीपक चव्हाण, सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे आ. गणपतराव देशमुख, तर माण मतदारसंघात काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे अशी राजकीय परिस्थिती आहे.  याशिवाय, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्या त्या आमदारांचे विरोधकही कमालीचे सक्रिय झाले आहेत. फलटणला राजे गटाविरोधात रणजितसिंह ना. निंबाळकर, माणला जयकुमार गोरेंविरोधात शेखर गोरे, अनिल देसाई, सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील गटाविरोधात बबनराव शिंदे, संजय शिंदे व रश्मी बागल असे प्रत्येक ठिकाणी विरोधाला विरोध असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाची उमेदवारी देताना गोची झाली आहे. त्यामुळेच मोहिते-पाटील यांच्या विरोधातील गट  प्रभाकर देशमुखांचे नाव पुढे करत आहे, तर  मोहिते-पाटील ‘पवारांनीच लढावे नाही तर रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी द्यावी,’ असे म्हणत आहेत.

टेेंभुर्णीत व त्यानंतर बोराटवाडीत मध्यंतरी झालेल्या बैठकीत असंतुष्ट गटाने त्यामुळेच वेगळी मोहीम राबवली.  दुसर्‍या बाजूला रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन एकच खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसवर एकप्रकारचे हे दबावतंत्र होते. रणजितसिंहांची ही खेळी एवढी अचूक ठरली आहे, की माढ्याचा उमेदवार कोणालाही निश्‍चित करता येत नाही. 

कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठित उमेदवाराला माढ्याची निवडणूक सोपी नाही.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असो अथवा महायुती,  अंतर्गत गटबाजीने माढा मतदारसंघ पोखरल्याने निवडणूक अटीतटीची होणार आहे. उमेदवारीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेला शिमगा आणि पक्षांतर्गत गटबाजीची धुळवड यामुळे माढ्यात निवडून आणण्याऐवजी पाडापाडीच्या राजकारणालाच उधाण आले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच संपूर्ण देशात गाजलेला मतदारसंघ प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत कोणते टोक गाठेल, याचा नेम नाही.  

माढ्याला हवा जलसिंचनाचा काढा...

गटबाजी, तिकिटाची साठमारी, माघारी याच चर्चेने गाजलेला माढा मतदारसंघ दुष्काळी जनतेच्या समस्यांनी मात्र त्रस्त असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. माण, सांगोला व फलटणचा काही भाग प्रचंड दुष्काळी आहे. तेथील काही भागांत अजून पाणी पोहोचले नाही. उजनी व निरा यांच्या पाणी वाटपाचा प्रश्‍न तसाच भिजत आहे. सत्ताधारी पक्षाने केलेले दुर्लक्ष, गटबाजीमुळे रखडलेला विकास आणि महानेते निवडून देऊनही न पोहोचलेले पाणी, अडचणीत आलेली साखर कारखानदारी हे माढ्याचे प्रश्‍न सोडवणारा मसिहा सामान्य जनतेला हवा आहे. दुर्दैवाने या प्रश्‍नांवर चर्चा होण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या बदललेल्या भूमिकांवरच जास्त चर्चा होताना दिसते आहे. दुष्काळी माढ्याला हवा जलसिंचनाचा काढा हे कुणी तरी सर्वच राजकीय पक्षांना सांगायला हवे. 

सातारा जिल्ह्याची मते निर्णायक

माढा मतदारसंघाची मतदार संख्या 17 लाखांहून जास्त आहे. त्यातील  सुमारे 6 लाख 60 हजार एवढे मतदार सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण व उत्तर कोरेगाव या चार तालुक्यांत म्हणजेच दोन विधानसभा मतदारसंघांत आहेत. पर्यायाने कोणत्याही राजकीय पक्षाने कोणताही उमेदवार दिला, तरी प्रादेशिक वादही विचारात घ्यावा लागणार आहे.