Mon, Mar 25, 2019 05:26
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पुनिता यांच्या लॉकरमध्ये 22 तोळे सोने

पुनिता यांच्या लॉकरमध्ये 22 तोळे सोने

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मंगळवारी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्या लॉकरमध्ये 22 तोळे सोने आढळले आहे. दरम्यान,  याचप्रकरणी फरार असलेल्या महाबळेश्‍वरच्या गटशिक्षणाधिकारी वंदना वळवी यांचा एसीबीकडून शोध सुरूच आहे. 

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तथा एसीबीने सोमवारी सायंकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. वेतनश्रेणी फरक बिल काढून तो मंजूर करण्यासाठी तक्रारदार शिक्षकाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुुरव व गट शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना भेटले असता दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार शिक्षकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. लाचेची रक्‍कम सोमवारी स्वीकारणार असल्याचे ठरल्यानंतर सातारा एसीबीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सापळा रचला. सोमवारी सायंकाळी पुनिता गुरव यांनी शिक्षण विभागाच्या  केबिनमध्ये लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली.

प्राथमिक शिक्षणाधिकारीच सापडल्याने सातारा जिल्ह्यासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.सोमवारी एसीबीच्या पथकाने पुनिता गुरव यांना अटक केल्यानंतर वंदना वळवी यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले. मात्र, वळवी पसार झाल्या असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी पुनीता गुरव यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. वंदना वळवी पसार झाल्याने व अन्य चौकशी करायची असल्याने त्या आधारावर पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्‍ला करत आहेत.