Fri, Apr 26, 2019 15:47होमपेज › Satara › 'वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालय पेटवू'(व्‍हिडिओ)

'वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालय पेटवू'(व्‍हिडिओ)

Published On: Dec 26 2017 5:14PM | Last Updated: Dec 26 2017 5:22PM

बुकमार्क करा

परळी : वार्ताहर 

वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, कर्मचार्‍यांची दुरुत्तरे आणि हलगर्जीपणा याला कंटाळून संतप्त झालेल्या परळी परिसरातील १५ गावांतील शेतकर्‍यांनी मंगळवारी येथील वीजवितरण कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, संबंधित अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास कार्यालय पेटवू असा इशारा दिला.

परळी परिसरातील अंबवडे, काळोशी, कुरुण, आरेदरे, पोगरवाडी, सोनवडी, गजवडी, लावंघर, करंजे, शिंदेघर, भोंदवडे, कारी यासह सुमारे १५ गावात वीजवितरणचा सावळा गोंधळ सुरु असून वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा, अनियमीत लोडशेडींग करणे, वीजवितरण अधिकार्‍यांकडून होणारे दुर्लक्ष, वीजबील वाढीव येणे, वीज बिल वेळेवर न मिळणे, वीज कार्यालयातील दूरध्वनी न उचलणे, कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष आणि डीपीमध्ये तकलादू तांब्याच्या तारा लावणे यासह अन्य तक्रारींचा पाढा वाचत मंगळवारी संतप्त शेतकर्‍यांनी वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. 

यावेळी संबंधित अधिकारी सहाय्यक अभियंता सतीश चव्हाण यांनी हे प्रश्‍न माझ्या अखत्यारित येत नाहीत. यासाठी तुम्हाला ग्रामीण विभागाचे अधिकारी बाळासाहेब मुंडे यांच्याशी चर्चा करावी लागेल, असे अजब उत्तर दिल्याने संतप्त शेतकर्‍यांनी त्यांना घेराव घातला.  यावेळी शाब्दिक चकमकही झाली. 

यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनाने समाधान न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास कार्यालय पेटवून देवू असा इशारा दिला.