Thu, Jan 24, 2019 00:14होमपेज › Satara › समाजाची मान्यता मिळाली तरच  साहित्य दर्जेदार होईल : प्रा.जाधव

समाजाची मान्यता मिळाली तरच  साहित्य दर्जेदार होईल : प्रा.जाधव

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 8:58PMउंब्रज ( यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी)/  : प्रतिनिधी

लेखक, साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या साहित्याला  कुटुंबासह समाजाची मान्यता मिळाली तरच ते साहित्य निर्माण होईल, असा आशावाद प्रा. डॉ. सतिश जाधव यांनी व्यक्त केला.
उंब्रज ता. कराड येथील दुसर्‍या राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उंब्रजचे कादंबरीकार सतिश जाधव, मरळी ता. कराडचे ग्रामीण साहित्यिक शंकर कवळे यांची पत्रकार अशोक चव्हाण, आनंदराव पाटील यांनी प्रकट मुलाखत घेऊन अंतरंग उघड केले. 

यावेळी डॉ. सतिश जाधव म्हणाले,  घरची परिस्थिती बेताची असूनही कृषी क्षेत्राचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन पी.एच.डी. प्राप्त केली.  माझे साहित्य किती दर्जेदार आहे हे त्या साहित्यावर एक युवक एम.फी.एल. करतोय याची माहिती मिळाल्यानंतर समजले.  शेतकरी जीवनावरील ’ झळ आणि बळ’ अशा दोन्ही कादंबरीला विविध पारितोषके प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

लेखक शंकर कवळे यांनी कुटुंब मजुरी करत असतानाही मला वाचनाची आणि लिखाणाची आवड निर्माण झाली. मी स्वतः मजुरी करत असताना  आरती, अनुराग,  बिजली अशा तीन कादंबर्‍याचे लिखाण केले. मात्र ते साहित्य प्रकाशित करण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने बराच काळ ते साहित्य पडून राहिले होते. अखेर मजुरीतून पैसे जमा करत ते साहित्य प्रकाशित केले. त्याचा मला काहीही आर्थिक लाभ झाला नाही. मात्र ’माणुसकी आणि मोठेपण ’ या कथा संग्रहाचा पाठ्यपुस्तकात समावेश झाल्यानंतर साहित्यासह स्वतः धूळखात पडलेल्या माझ्या सारख्या लेखकाला प्रसिद्धी मिळाली. म्हणूनच आज त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

   प्रारंभी पत्रकार आनंदराव पाटील यांनी सतिश जाधव, शंकर कवळे यांचा परिचय करून दिला. स्वागत उद्योजक करण घुटे यांनी केले.  सूत्रसंचालन सुरेखा भोसले यांनी केले तर आभार दिलीप चव्हाण यांनी मानले.