होमपेज › Satara › ‘बंद दारू दुकाने चालू अन् चालू शाळा बंद’

‘बंद दारू दुकाने चालू अन् चालू शाळा बंद’

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:29PM

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालूनही त्यावर पळवाट शोधून पुन्हा बंद असणारी देशी, विदेशी दारू दुकाने चालू केली. मात्र तेच शासन दुसरीकडे पटसंख्येच्या कारणास्तव चालू शाळा बंद करण्याच्या तयारीला लागले आहे. शिक्षकांना शालेय वेळेत मोबाईल वापरावर बंदी घालायची आणि दुसरीकडे सगळा डाटा मोबाईलवर पाठवायचे बंधन घालायचे, हा विरोधाभासही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार देशी, विदेशी दारू दुकाने यासाठीचे अंतर यामुळे दारू दुकाने पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आली. मात्र, त्यावरही पळवाटा काढत ग्रामपंचायत वगळता सर्व ठिकाणची दारू दुकाने पुर्ववत चालूही झाली. वास्तविक जर शासनाला खरोखरच दारू बंदच करायची असती तर त्यांनी दुकानांऐवजी दारू निर्मितीच बंद केली असती.

मात्र केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी अधूनमधून असे फंडे वापरले जातात. एका बाजूला ही बंद दुकाने चालू झाली की लगेचच शासनाचा नवा फतवा बाहेर आला. ज्या ठिकाणी कमी पटसंख्या असेल अशा शाळा बंद करण्याचे नवीन धोरण बाहेर येवू लागले. त्याचवेळी दुसरीकडे खाजगी कार्पोरेट शाळांसाठी लगेचच बँडबाजा सुरू झाला. वास्तविक यामुळे ग्रामीण, भौगोलिकदृष्टया मागासलेल्या व अशिक्षित जनतेवर याचा गंभीर परिणाम होणार आहे हे नाकारून चालणार नाही.

काही ठिकाणी निश्‍चितच कमी पटसंख्या आहे. त्यामुळे तेथे शासन खर्चाचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र त्याचवेळी ती शाळा बंद झाल्यावर दुसर्‍या गावच्या शाळेत समायोजन झाल्यावर त्या दोन्ही गावातील अंतर, रस्त्यांची गैरसोय, पावसाळा, अतिवृष्टीच्या काळात नदी, ओढ्यांमधूनचा प्रवास त्याचबरोबर अलीकडच्या काळात ग्रामीण विभागात वन्य प्राण्यांचे हल्ले यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही तितकाच गंभीर आहे. यापूर्वीच्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व नव्हते. आता शिक्षणाचे महत्त्व पटले असतानाच शासनाच्या निर्णयामुळे मुले पुन्हा निरक्षर रहाण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे भलेही शासनाला हा खर्च जास्त वाटत असेल तरी कोणीही निरक्षर राहू नये यासाठी शासनाने याचा पुनर्विचार करावा असे सामाजिक मत आहे. 

याच काळात एका बाजूला शालेय आवारात शिक्षकांना मोबाईल वापरायला बंदी घातली आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शाळेच्या सर्व माहिती या मोबाईलवरून पाठवायचे बंधन घातले आहे, असाही विरोधाभास अनुभवायला मिळत आहे. शिक्षकांना ज्ञानदानापेक्षा अन्य बाह्यकामांनाच मोठ्या प्रमाणावर गुंतविले गेल्याने मग मुळचा प्राथमिक शिक्षणाचा स्तर कसा सुधारणार ? असा प्रश्‍न सर्वांसमोरच निर्माण झाला आहे.