Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Satara › लिंब-गोवेच्या पुलाजवळ धोकादायक वळण

लिंब-गोवेच्या पुलाजवळ धोकादायक वळण

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 9:00PMलिंब : वार्ताहर

लिंब -गोवे दरम्यान कृष्णा नदीवर नव्याने उभारण्यात आलेला पूल अयोग्य नियोजनामुळे भविष्यात अपघाताचा टर्निंग पॉईंट ठरणार असल्याची भीती व्यक्‍त होत आहे. पुलाला दोन्ही बाजूचे रस्ते जोडताना त्रुटी राहिल्या असून धोकादायक वळण निर्माण झाले आहे. ठेकेदार, अधिकार्‍यांसह परिसरातील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय  नसल्यामुळे ही स्थिती उद्भवली. निदान पुलाच्या उद्घाटनापूर्वी तरी त्रुटी दूर करण्याची मागणी  लिंब गोवे परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.

कृष्णा नदीस पावसाळ्यात येणार्‍या महापुरामुळे कोटेश्‍वर मंदिराजवळील पूल अनेक दिवस पाण्याखाली जात असल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे लिंब - गोवे परिसरातील ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीमुळे अखेर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे साडेपाच कोटी रुपये अंदाजपत्र असलेल्या या कृष्णा नदीवरील पुलास अनेक अडचणीनंतर कामास सुरूवात झाली .
काही महिन्यातच पुलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजू जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु पुलाच्या बाजूला असणार्‍या शेतकर्‍यांशी योग्य पद्धतीने बोलून मार्ग काढणे आवश्यक असताना ठेकेदार, अधिकारी व परिसरातील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने ठेकेदाराने लिंब बाजूकडील शेताच्या ठिकाणी रस्त्याला धोकादायक वळण  दिल्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याठिकाणी एक प्रकारे चौकच तयार झाला आहे.  नवीन पुलाकडे जाताना अथवा पुलाकडून येताना समोरून येणारे वाहन दिसतच नाही. त्यामुळे येथील वळण हटवून रस्ता सरळ करणे गरजेचे आहे. 

कृष्णा नदीवरील पुलाचे ठेकेदार, शासकीय अधिकारी व स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन समन्वय राखून लिंब - गोवे परिसरातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन  नवीन रस्त्याची रचना करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.