Tue, May 26, 2020 22:44होमपेज › Satara › सातार्‍यामधील लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता धूसर

सातार्‍यामधील लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता धूसर

Published On: Sep 21 2019 12:45PM | Last Updated: Sep 21 2019 12:05AM

संग्रहित छायाचित्रसातारा : प्रतिनिधी

श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा निवडणूक व लोकसभेची पोटनिवडणूक लागेल, अशी चर्चा होती. मात्र, भारत निवडणूक आयोगाकडून पोट निवडणुकीच्या अनुषंगाने कसलीही सूचना केलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून विधानसभेचीच तयारी करण्यात आली आहे. आयोग कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता धुसर झाली आहे.

जिल्ह्यातील आठही  मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना लोकसभेच्या पोट निवडणुकीची राजकीय तयारी कुठेही सुरु नसल्याचे चित्र सातारा लोकसभा मतदारसंघात आहे. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले  श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीनंतर तीनच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे या जागेसाठी विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. श्री. छ. उदयनराजे यांनी  राजीनामा दिला तर लोकसभेचे अध्यक्ष मंजूर करुन पोट निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रपती अधिसुचना जारी करतील आणि आयोग त्यावर पोट निवडणूक लावेल, याचे राजकीय आडाखे बांधले जात होते. राजीनामा उशिरा दिल्याने विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्रित लागणार नाही, असे राजकीय जाणकरांचे मत होते. या राजकीय अंदाजाला बळकटी येवू लागली आहे. प्रशासकीय पातळीवर विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र लोकसभेच्या पोट निवडणुकीच्या बाबतीत सगळं सामसूम आहे. 

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला काहीही कळवलेलं नसल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर या निवडणुकीपुरतीच ईव्हीएम मशीन्स सध्या उपलब्ध आहेत. विधानसभा निवडणुकीपुरतीच कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास प्रशासनावर कमालीचा ताण येणार आहे. संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने लोकसभा पोट निवडणुकीसाठी पोलिस बंदोबस्त देताना कसरत करावी लागणार आहे.  प्रशासकीय पातळीवर सुरु असलेल्या धावपळीवरुन लोकसभेची पोट निवडणूक स्वतंत्र घेतली जाण्याची शक्यता आहे. तरीही जिल्हावासियांचे लक्ष भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या घोषणेकडे लागले असून कमालीची उत्सुकता लागली आहे.