Tue, Apr 23, 2019 02:02होमपेज › Satara › वणव्यामुळेच बिबट्या नागरी वस्तीत घुसला

वणव्यामुळेच बिबट्या नागरी वस्तीत घुसला

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 9:16PMसातारा : संजीव कदम

शाहूपुरीतील मध्यवस्तीमध्ये असणार्‍या खटावकर कॉलनी  व जयहिंद कॉलनी मंगळवारी दुपारपासून भीतीच्या छायेखाली वावरत असून बिबट्याने तिघांना जखमी केले आहे. या घटनेने या दोन्ही कॉलनींसह अवघ्या शाहूपुरीत थरकाप उडाला आहे. जीव मुठीत धरुन नागरिकांचा वावर सुरु असून कोठूनही येवून बिबट्या हल्‍ला करेल, अशी भयावह परिस्थिती ओढवली आहे. मॉर्निंग वॉकला जाणे संबंधितांनी बंद केले असून मुलाबाळांना शाळेत सोडायलाही पालक धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, भैरोबाच्या डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे बिबट्या खाली येवून नागरी वस्तीत घुसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने बुधवारी दुपारी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे सर्च मोहीम राबवली. 

सातार्‍याच्या पश्‍चिमेकडील शहरालगत असलेल्या डोंगराला लागूनच  शाहूपुरी विसावली आहे. मंगळवारपासून मात्र या शाहूपुरीतील खटावकर कॉलनी व जयहिंद कॉलनीत बिबट्याने थरकाप उडवून दिला आहे. या दोन्ही कॉलनी  अंबेदरे रोडलगतच्या दाट झाडीतील ओढ्यालगत असून दुपारी 2 च्या सुमारास खटावकर कॉलनीतील नागरिकांना बिबट्याची चाहुल लागली होती. सायंकाळ होत आली तेव्हा खटावकर कॉलनी व आंबेदरे रस्त्याच्या परिसरात कुत्री भुंकत होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना संशय आला. युवकांनी परिसरात शोध सुरू केला. सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरात असलेल्या एका घळीमध्ये बिबट्यासारखा प्राणी असल्याचे या युवकांना दिसले. नेमके  काय आहे हे पाहण्यासाठी गेल्यानंतर गौरव माने या युवकावर बिबट्याने  केलेला हल्‍ला कचरता गेला. मात्र, त्यानंतरही बिबट्याने आणखी दोघांवर हल्‍ला केला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश ओळीवडेकर (रा. जयहिंद कॉलनी), वसंतराव ज्ञानदेव ढगाले (रा. खटावकर कॉलनी) यांना बिबट्याने फटकारले असून त्याच्या पंजाच्या हल्ल्यामुळे या दोघांच्याही शरीरावर वर्मी घाव बसले आहेत. 

एक मादी अन् दोन पिल्‍ले

अंबेदरे रोडलगत ओढा असून दाट झाडीमध्ये तो गुरफटला गेला आहे. या ओढ्याला लागूनच खटावकर कॉलनी व जयहिंद कॉलनी असून येथील नागरी वस्तीपर्यंत बिबट्या घुसला कसा? याबाबतही नागरिक व वनविभाग तर्क वितर्क लढवत आहेत. दोन दिवसांपूर्वी पेढ्याच्या भैरोबा डोंगराला वणवा लागला होता. या डोेंगर परिसरातच या बिबट्याचा वावर होता. वणवा लागल्यानंतर मादी जातीच्या या बिबट्याने आपल्या दोन पिल्‍लांसह खटावकर कॉलनीलगतच्या ओढ्यातील दाट झाडीत आश्रय घेतल्याचे सांगितले जात आहे.

घराच्या टेरेसवरुनच घेतला जातोय कानोसा 

बिबट्याने हल्‍ला करुन तिघांना जखमी केल्यानंतर खटावकर कॉलनीसह अवघी शाहूपुरी भयभीत झाली आहे. दैनंदिन कामकाज करतानाही नागरिकांना धडकी भरत आहे. घराबाहेर पडणेही टाळले जात आहे. खटावकर कॉलनी व ओढा परिसरात वन विभागाने बिबट्यासाठी फिल्डींग लावली आहे. नागरिक मात्र बंद घरातून तसेच घराच्या टेरेसवरुन बिबट्याचा व त्याला पकडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा कानोसा घेताना दिसत आहेत. या कॉलनीजवळच शाळाही आहे. त्यामुळे काही पालकांनी आपल्या पाल्यांना बुधवारी शाळेतून घरी ठेवल्याचे दिसून आले. अनेकांनी तर मंगळवारची आख्खी रात्र बिबट्याच्या भीतीने जागून काढली.

बिबट्याला पकडण्यासाठी कुत्रे

मंगळवारी सायंकाळनंतर शाहूपुरीत बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलिस दाखल झाले. मंगळवारी रात्री बिबट्याचा लांबूनच कानोसा घेत सर्च मोहीम राबवण्यात आली. बुधवारी सकाळी वन विभागाने ओढ्यातील विहिरीलगत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजर्‍याला दोन युनिट असून एका युनिटमध्ये कुत्रे ठेवण्यात आले आहे. या कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या आला तर तो आपोआप त्या पिंजर्‍यात कैद होईल, अशी रचना करण्यात आली असून तशी परिस्थिती पिंजर्‍यालगत निर्माण केली गेली आहे. कुत्रे पिंजर्‍यातील दुसर्‍या युनिटमध्ये असून त्याला बिबट्यापासून कोणताही धोका होणार नाही. मात्र, त्याच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या कैद होणार आहे.