Sun, Jun 16, 2019 03:13होमपेज › Satara › कण्हेर परिसरातही बिबट्याचा वावर 

कण्हेर परिसरातही बिबट्याचा वावर 

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 8:19PMकण्हेर : वार्ताहर

कण्हेर, (ता. सातारा) परिसरात असलेल्या वाड्या-वस्त्यांवर बिबट्याचा खुलेआम वावर वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री शेतकरी व महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

सध्या परिसरातील कण्हेर, गवडी, साबळेवाडी, जांभळेवाडी व वाघजाईनगर या गाव व वस्त्यांच्या परिसरात गेल्या चार दिवसात बिबट्या अनेकवेळा नागरिकांच्या नजरेस पडला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपूर्वी कण्हेर येथील वेण्णा नदी शेजारी असलेल्या घरातील दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. या परिसरात गेल्या वर्षभरापासून सातत्याने वाघाचे दर्शन होत असून अलिकडे वारंवार अनेकांना बिबट्या दिसत आहे. ही वार्ता वाडीवस्तीतील ग्रामस्थांना समजल्यानंतर अनेकांमध्ये भिती निर्माण होऊन घराबाहेर पडण्यास धाडस होत नाही. 

या बिबट्याची परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून जनता जीव मुठीत धरुन जगत आहे. शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या गोट्याजवळ बिबट्या वारंवार फेरफटका मारताना दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये घाबरगुंडी उडाली आहे. या गावांच्या शेजारी डोंगरामध्ये बिबट्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. वनविभागाने याबाबत दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी दहशतीखाली वावरणार्‍या ग्रामस्थांकडून होत आहे.