Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Satara › कोकण विधानपरिषदेसाठी काँग्रेसला पाठिंबा : अजित पवार

कोकण विधानपरिषदेसाठी काँग्रेसला पाठिंबा : अजित पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कोकणातील विधानपरिषदेची जागा काँग्रेसची आहे. तेे जे उमेदवार देतील, त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय  आम्ही घेतला आहे. समविचारी पक्षाच्या मतांची विभागणी होऊ नये व त्याचा फायदा भाजपा सारख्या जातीयवादी पक्षाला होऊ नये, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या साक्षीने मी हे मत व्यक्त करत आहे, असेही ते म्हणाले.  स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण कसे करायचे याचे धडे यशवंतराव चव्हाण यांनी दिले आहेत. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जाण्याऐवजी भाजपचे सरकार पूर्णपणे भरकटले आहे. सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. मात्र, जिल्ह्यासाठी दिलेल्या आश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन भाजप सरकारने पूर्ण केलेले नाही. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असणार्‍या देवराष्ट्रात काही कामे आम्ही सुचविली होती. ती कामे परत जाण्याची वेळ आली आहे. मात्र, या संदर्भात कोणीच पाठपुराव करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी मिळेल का? याबाबत तो साशंक आहे. कर्जमाफीची घोषणा मुंबईच्या अधिवेशनात झाली होती. नागपूरचे अधिवेशन आले तरी कर्जमाफी शेतकर्‍यांना मिळाली नाही. 

शेतकर्‍यांना गोळ्या घालण्याचे काम या सरकारने केले आहे. गंगामाई साखर कारखान्यावर झालेल्या गोळीबारात काही शेतकरी जखमी झाले आहेत. तरीही शेतकर्‍यांना अद्याप दर मिळत नाही. गेल्या वर्षी पाच लाख कोटी साखर कारण नसताना आयात केली. यामुळे ऊसाला प्रतिटन 3500 ते 3600 दर मिळण्याऐवजी तो दर 3200 पर्यंत आला. युवकांना नोकर्‍या नाहीत, शिक्षक, कामगार हवालदिल आहेत, जीएसटीमुळे व्यापारी वर्गात असंतोष आहे. आमच्या काळात सुरू केलेल्या शिष्यवृत्त्या या सरकारने बंद केल्या. वीजेचा खेळखंडोबा आहे, अशा सर्वच पातळीवर सरकारचे हे अपयशी ठरले आहे. 

शिवसेनेचा ढोंगीपणा...
शिवसेनेची दुटप्पी भूमिका असून सत्तेत राहून सरकारला विरोध करणे ही जनतेची निव्वळ दिशाभूल आहे. मात्र, जनता हे सर्व जाणून आहे. शिवसेनेला सत्तेची उब पण हवी आहे आणि विरोधी पक्षात ‘स्पेस’पण पाहिजे, सर्व आधाशासारखे घेण्याचा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, जनता त्यांचा हा ढोंगीपणा उघड केल्याशिवाय राहणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.