होमपेज › Satara › सीईओंना दांडक्याने ठोकण्याची भाषा 

सीईओंना दांडक्याने ठोकण्याची भाषा 

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:33AMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात रस्त्यांवर खड्डे, पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न, दिवाबत्तीची समस्या कुणी सोडवत नसेल, तर त्याला दांडक्याने  ठोकले पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभागात नागरिक आम्हाला बोलतात त्याच भाषेत तुम्हाला सांगायला हवे, अशा शब्दांत भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सुनावले. परिणामी, नगरपालिकेतील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी  या वक्‍तव्याचा निषेध म्हणून ‘काम बंद’ आंदोलन केले. सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी पार पडली. सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर विषय घेतले जात नसतानाच त्याचा जाब सुद्धा विचारु दिला जात नाही. विरोधकांचा कोंडमारा होत असतानाच सभेचे कामकाज आवरण्यात आल्याने भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे संतप्‍त झाले.

सत्‍ताधार्‍यांनी गदारोळात सर्व विषय मंजूर करुन घेतल्याने विरोधी ‘नविआ’ तसेच भाजप नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. सभा संपल्यावर आसनावरुन उठताना धनंजय जांभळे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा रोख धरला. त्यांच्याजवळ जाऊन विषयपत्रिकेवर विषय का घेतले नाहीत? अशी विचारणा केली. शहरात नागरी समस्या असताना त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. वॉर्डात नागरिक ज्या भाषेत आमच्याशी बोलतात त्याच भाषेत याठिकाणी तुम्हाला सांगायला हवे.

काम न करणार्‍यांना दांडक्याने ठोकले पाहिजे. रजिस्टर खरेदी खत तुमच्या नावे झाले म्हणून संपूर्ण शहराचा सातबारा तुमच्या नावे झाला असे वाटू देऊ नका. तसे वाटत असेल तर संपूर्ण शहरासह नगरपालिका विकून टाका,  अशा शब्दांत जांभळे यांनी राग व्यक्‍त केला. मात्र, मुख्याधिकार्‍यांना अवमानकारक शब्द वापरले गेल्याने कर्मचार्‍यांनी या प्रकाराचा निषेध केला. कर्मचारी संघटनेने ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. याबाबत शंकर गोरे यांना विचारले असता ते म्हणाले, जांभळे बोलत होते त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे.  सभागृहात जे काही झाले त्याची सीडी पाहून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल, असे सांगितले. 

धनंजय जांभळे म्हणाले, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून बदनामी करण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न आहे. सत्ताधारी नागरिकांच्या समस्या सोडवत नसल्याने आम्ही उपोषण, निवेदन ही लोकशाहीतील सनदशीर पद्धत अवलंबली. तरीही सत्ताधार्‍यांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे.  मी जे बोललो ते  शहरातील लोकांच्या भावना आहेत. मुख्याधिकारी व पोलिस यांच्यावर दबाव टाकूनच माझ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.