Wed, May 22, 2019 22:40होमपेज › Satara › महाकाय दरडींमुळे केळवली भीतीच्या छायेखाली

महाकाय दरडींमुळे केळवली भीतीच्या छायेखाली

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:27PMपरळी : सोमनाथ राऊत 

सातारा तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात डोंगरावर वसलेले केळवली गाव अक्षरश: जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत आहे. गावाच्या  डोक्यावर असलेला उंच कडा माळीणसारखी भीती दाखवत असून या कड्यावरून एक दोन नव्हे तर अनेक महाकाय दगड कधी गावावर येऊन कोसळतील याचा नेम नाही. अशा भीतीच्या छायेत गावकरी दिवस ढकलत आहेत. 

केळवली गावची भौगोलीक परिस्थिती अत्यंत विदारक आहे. या गावात आता कुठे वाहन पोहचू लागले आहे. तेही खाजगी वाहनचालक आपल्या जोखमीवर नेत असतात.   या गावात अजून एसटी येत नाही. केळवली, सांडवली, वारसवाडी, दावन, गणेशवाडी अशी मिळून एक ग्रामपंचायत आहे. केळवली  आणि सांडवली या गावात जायचे म्हटले तर केळवली ते सांडवली जायला एक संपूर्ण दिवस मोडतो. कारण रस्त्यात असलेले ओढे, नाले, डोंगरदर्‍या अशी परिस्थिती असल्यामुळे विकास कामांना मर्यादा येत आहेत.  

केळवली ग्रामस्थ आ. शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांपासून उपाययोजनांबाबत आग्रही आहेत. गावच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या मोठं मोठ्या दगडी निकामी कराव्यात म्हणजे त्या गावावर पडणार नाही, यासाठी आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकार्‍यांकडे ग्रामस्थ हेलपाटे मारत आहेत. तसा त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र आजपर्यंत काहीही साध्य झालेले नाही. कोणत्याही कार्यालयात गेल्यावर वरिष्ठांकडे प्रकरण पाठवले असल्याचे सांगितले जाते. 

निधीची उपलब्धता झाल्यावर तुमच्या गावचे पुनवर्सन किंवा अन्य बाबी पूर्ण केल्या जातील, अशी उत्तरे मिळत आहेत. सद्यःस्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे या डोंगरावर   माती दगडाचा भराव खाली ढासळत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या काही दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास माळीणसारखी परिस्थिती ओढवण्याची भिती आहे. तसे घडले तर त्याला जिल्हा प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिला.