Sat, Jan 19, 2019 03:25होमपेज › Satara › सातारा तहसीलदारांना वाळूमाफियांकडून धमकी

सातारा तहसीलदारांना वाळूमाफियांकडून धमकी

Published On: Mar 23 2018 7:16PM | Last Updated: Mar 23 2018 7:16PMसातारा : प्रतिनिधी

बेकायदा वाळू वाहतूकप्रकरणी पकडलेला डंपर सोडा अन्यथा कार्यालयाच्या दारात आत्मदहन करेन, अशी धमकी एका वाळूमाफियाने सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना दिली आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा विचार महसूल विभाग करत आहे.

सातारा तालुका पोलिसांनी खिंडवाडी येथे रात्रीच्यावेळी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर पकडा होता. संबंधित वाळूठेकेदार खटाव तालुक्यातील असल्याचे त्यावेळी समोर आले. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी जप्त केलेला डंपर सातारा तहसीलदार कार्यालयाच्या ताब्यात दिला. संबंधित डंपरला दोन लाख ६८ हजाराचा दंड करण्यात आला. बेकायदा वाळूवाहतूक तसेच त्यासाठी वापरलेले वाहन या दोन्हीही बाबी लक्षात घेवून नव्या नियमानुसार सातारा तहसीलदारांनी संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई केली. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न करुनही काहीच झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या वाळू ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍याचा संदर्भ दिला. मात्र, तरीही उपयोग होत नसल्याने वाळू ठेकेदाराने सातारा तहसीलदारांना दम दिला. वाहन सोडले नाही तर तुमच्या कार्यालयाच्या दारात आत्मदहन करेन, असा इशाराच त्याने दिला. संतापलेल्या तहसीलदारांनी संबंधित वाळू ठेकेदाराला कार्यालयाबाहेर काढले. त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यावर कार्यालयात चर्चा सुरु आहे.
 

Tags : satara tahsildar, land smuggler