Tue, Apr 23, 2019 23:55होमपेज › Satara › सिडकोतील जमीन घोटाळ्यातील सोनेरी टोळीला राजाश्रय: पृथ्वीराज चव्हाण

सिडकोतील जमीन घोटाळ्यातील सोनेरी टोळीला राजाश्रय: पृथ्वीराज चव्हाण

Published On: Jul 07 2018 3:32PM | Last Updated: Jul 07 2018 3:31PMकराड : प्रतिनिधी

कोणतीही पूर्व तयारी न करता मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेतले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागपूर जलयुक्त झाल्याचा आरोप करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यांनी वाढवावा, अशी मागणी केली. तसेच सिडकोतील जमीन खरेदी प्रकरणात सोनेरी टोळी असून त्यांना राजकीय व्यक्तीचा राजाश्रय आहे. त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती दिली असली तरी त्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मलकापूर (ता. कराड) नगरपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शासनाने कोणतीही पूर्व तयारी न करता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेतले. त्यामुळे पावसाने एका दिवसात नागपूर जलयुक्त झाले. त्याचा फटका अधिवेशनाच्या कामकाजालाही बसला असून अधिवेशनाचे दिवस कमी झाले आहेत. एक तर विरोधी पक्षातील आमदारांना विधीमंडळात बोलण्याची संधी फार कमी मिळते किंवा दिलीच जात नाही. अशा परिस्थिती मिळेल तेवढ्या वेळेत विरोधीपक्ष जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, जलयुक्त नागपूरमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी झाला असून अनेक विषयांवर चर्चा करता आली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा करून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा. 

सिडकोतील जमीन खरेदीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सिडकोतील जमीन खरेदीमध्ये सोनेरी टोळी कार्यरत असून त्यांना राजकीय व्यक्तीचा राजाश्रय आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ व्यक्तींकडून अशी कामे करून घेतली जातात. त्यामुळे सिडकोतील जमीन खरेदीला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही तर या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. आमच्या कालावधीतही जर असे काही झाले असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

हा प्रश्‍न आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न विचारला असून त्यांनी आमच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले पाहिजे. इतरांनी त्याचे स्पष्टकरण देण्याचे कारण नाही, असे चव्हाण यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.  

पानसरे व दाभोलकर यांचे खून प्रकरण फार गंभीर बाब आहे. विचारांची हत्या करण्याचा व आवाज बंद करण्याचा हा प्रकार आहे. याबाबत कर्नाटक सरकारने शोधलेल्या मारेकर्‍यांशी कोणाचे लागेबांधे आहेत. हे तो सांगत असतानाही त्याची पुढे चौकशी करायला सरकार तयार नाही. त्यामुळे त्या संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावेळी आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर प्रमुख उपस्थित होते.  

सिडकोतील जमीन घोटाळ्याची माझ्याकडे सर्व कागदपत्रे... 

सिडकोतील जमीन घोटाळ्यातील सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. विधीमंडळामध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही. माझ्याकडे सर्व माहिती असून हा घोटाळा कसा झाला, संबंधित शेतकर्‍यांना कशा प्रकारे धरून आणले, त्यांना अर्ज कसे करायला लावले, जमीन मिळण्यापुर्वीच त्या शेतकर्‍यांकडून जमीन खरेदी कशी केली, १५ लाख रुपये एकराने जमीन विकण्याचे आश्‍वासन कोणी दिले, पुनर्वसनाची जमीन १० वर्षापर्यंत विकता येत नाही, असा कायदा असतानाही २६ फेब्रुरवारीला मिळालेल्या जमिनीचा लगेच १४ मेला व्यवहार कसा झाला. तर १८ मेला सरकारने १० वर्षाची अटही रद्द केली, ही सर्व माहिती कागदोपत्री माझ्याजवळ आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

साडेतीन लाखाला बिल्डरला विकलेल्या प्लॉटची किंमत १५०० कोटी...

साडेतीन लाखाला एका बिल्डरला दिलेल्या प्लॉटची किंमत बाजारभावाप्रमाणे १५०० कोटी रुपये आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आठ लोकांची नावे पुढे करून त्यांच्या सह्या घेतल्या व जमीन खरेदी केली. हा गंभीर प्रकार असून याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. केवळ स्थगिती देऊन आमचे समाधान होणार नाही. हा घोटाळा ज्या सोनेरी टोळीने केला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणीही जबाबदार असले तरी त्यांना अभय देऊ नये. यामध्ये कोणकोण व्यक्ती घुसल्या आहेत, त्याची चौकशी करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्यावेळीही काही झाल्याचे सांगितले आहे. मात्र, जमीन सरकारच्या मालकीची म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेच्या मालकीची आहे. ती अशी कशी बिल्डरच्या घशात घालता येईल. ते आम्ही होऊ देणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.