कराड : प्रतिनिधी
कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर 40 वर्षापूर्वी पुनर्वसन झालेल्या मसूर (ता. कराड, जि. सातारा) परिसरातील वाघेश्वर प्रकल्पग्रस्तांसह पाच गावच्या धरणग्रस्तांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली 1 मार्चपासून कराडच्या भूमिअभिलेख कार्यालयातच आंदोलन करण्याचा प्रकल्पग्रस्तांनी निर्णय घेतला असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल घराळ यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना दिलेल्या निवेदनात 28 फेब्रुवारीपर्यंत प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींच्या मोजणीचे काम हाती घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र याबाबतच कोणतीच कार्यवाही न झाल्यास 1 मार्चपासून भूमिअभिलेख कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प पाडणार आहोत, असे प्रकल्पग्रस्तांनी या निवेदनात म्हटले आहे.