Tue, Mar 19, 2019 11:58होमपेज › Satara › उमरकांचन धरणग्रस्तांना तडसरमध्ये जमीन

उमरकांचन धरणग्रस्तांना तडसरमध्ये जमीन

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 10:56PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील तडसर येथील गायरानात वांग धरणग्रस्तांपैकी उमरकांचन (ता. पाटण) गावच्या 61 खातेदारांना प्रशासनाने पुनर्वसनासाठी जमिनीचा ताबा दिला. जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्मिता कुलकर्णी,प्रांताधिकारी डॉ.विजयकुमार देशमुख आणि तहसीलदार अर्चना शेटे यांच्या उपस्थितीत 40 खातेदारांना  वाटप करून जमिनीचा ताबा देण्यात आला.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

उमरकांचन गावाच्या पुनर्वसनास तडसर येथील गायरान जमिनीपैकी 59 हेक्टर क्षेत्र एका तळावर देण्याच्या शासन निर्णयास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.शासनाच्या विरोधात  धरणे आंदोलन करण्यात आले होते.उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.परंतु न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला.

आज सकाळी 7 वाजता तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी जमिनीचा ताबा देण्यासाठी उपस्थित होते. उमरकांचन गावातील 41 खातेदार व महिला तरुण उपस्थित होते.ताबा मिळताच ते भारावून गेले आणि त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.नायब  तहसीलदार धाईगुडे ,भूमी अभिलेख अधिकारी ज्योती पाटील ,भूकरमापक सुनील लाळे, महेश डवरी ,पाटबंधारे विभागाचे दाभाडे ,मंडल अधिकारी एस.एम.कांबळे ,तलाठी डी.बी.कुंभार उपस्थित होते.चिंचणी -वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तडसर मधील 59 हेक्टर जमीन धरणग्रस्तांना 

तडसर येथे 119.63 हेक्टर क्षेत्र गायरान जमीन आहे.यामध्ये कृषी विज्ञान केंद्रासाठी 20 हेक्टर जमीन मंजूर आहे. गोदानसाठी 1 हेक्टर ,कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 2 हेक्टर जमीन दिली आहे. आता धरणग्रस्तांना 59 हेक्टर क्षेत्र जमीन देण्यात आली आहे.त्यामुळे आता गावात शिल्लक क्षेत्र 36 हेक्टर राहत आहे.