Sun, Jul 21, 2019 16:32
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मॅनेजर लोखंडेचा जामीन अर्ज फेटाळला

मॅनेजर लोखंडेचा जामीन अर्ज फेटाळला

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:31PMकुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील कुडाळ करंदी परिसरातील सात  शेतकर्‍यांच्या पीक कर्जात 22 लाखांची अफरातफर करून शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा मॅनेजर मनोज लोखंडेचा जामीन अर्ज सातारा कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती मेढा पोलिस ठाण्याचे स.पो.नि जीवन माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

स.पो.नि माने म्हणाले, कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध तक्रारींचा ओघ वाढला असून फसवणुकीचा आकडा पाव कोटीच्या घरात गेला आहे. आणखी मोठा पीक कर्जाचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा घोटाळा करून कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्रचा मॅनेजर लोखंडे गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांना मिळून आलेला नाही. 

एजंट मंगेश निकमला हाताशी धरून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याबद्दल मॅनेजर लोखंडे, शिपाई व एजंट यांच्या विरोधात मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील पोलिसांनी शिपाई  गाढवे व एजंट मंगेश निकम याला अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. 

मेढा पोलिस ठाण्यात लोखंडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याने सातारा कोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने गुरुवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. जीवन माने म्हणाले, कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेतकरी कर्ज प्रकरणातील फसवणुकीच्या तक्रारी मध्ये शेतकर्‍यांच्या जबाबावरून सत्यता  पडताळून थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एकूण तीन आरोपी असून दोन आरोपींना तपासासाठी अटक करून कोर्टापुढे हजरही केले आहे. लोखंडेचा अर्ज फेटाळल्याने त्याला कधी अटक करणार? असा सवाल फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी केला आहे.