Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Satara › होळीनंतर गुढीपाडवाही आंदोलनस्थळीच

होळीनंतर गुढीपाडवाही आंदोलनस्थळीच

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 19 2018 1:07AMपाटण : प्रतिनिधी

कोयनानगर येथील धरणग्रस्तांनी आंदोलनाच्या 21 व्या दिवशी गुढीपाडवा आंदोलनस्थळीच साजरा केला. सकाळी डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते गुढी उभारून पूजन करण्यात आले. सर्व धरणग्रस्तांनी गुढीला साक्षी ठेवून मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलनस्थळावरून उठायचे नाही, असा निर्धार केला आहे.

प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे रविवारी सकाळी आंदोलनस्थळीच गुढी उभारत होळी पाठोपाठ पाडवाही आंदोलनस्थळीच साजरा केला. यावेळी डॉ. पाटणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडून आलेले बैठकीचे निमंत्रण हे प्रकल्पग्रस्तांच्या एकीचा आणि संघटित शक्तीचा विजय आहे. गेले 21 दिवस प्रकल्पग्रस्तांनी शांततेने आणि संयमाने ठिय्या मांडून बसल्यामुळेच हा निर्णय झाला आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. यावेळी विविध विभागांचे संबंधित मंत्री, अधिकारी असणार आहेत. त्या ठिकाणी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडणार आहे. आपल्या मागण्या कायद्यात बसणार्‍या आहेत. उद्याची बैठक ही यशाची बैठक होणार आहे. बैठक झाल्यावर आम्ही इथे येईपर्यंत तुम्ही डोळ्यात तेल घालून बसा, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

या लढ्याने तुम्हाला शांततेच्या मार्गाने न्याय मागितला तर मिळतो, हे शिकविले. आम्ही जंगले राखली, पण त्यांनी जंगले नष्ट केली. इथे पर्यटन वाढले पाहिजे, यासाठी हा ठराव आपण करत आहोत. यातून गुलामी पूर्णपणे संपवायचा प्रयत्न करायचा आहे.  मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे पत्र दिले आहे, म्हणून आपण लाँग मार्च करत जाण्याऐवजी आंदोलनस्थळावर बसून राहायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच आंदोलनाची पुढची दिशा ठरविली जाईल. संकलन रजिस्टर करणे, सरळ वारसदार खातेदार करणे, प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्तींना  नोकरीत समाविष्ट करणे, वीज मोफत, शेतीला पाणी मोफत, कोयना जलाशय शेजारी लँड पूल करून प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करणे, मूळ मालकांच्या जमिनी परस्पर वन खात्याने वर्ग केल्या आहेत, त्या परत मिळणे आवश्यक असल्यास संपादन करून मोबदला देणे, 2013 चा राष्ट्रीय संपादन कायदा लागू करणे या प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असे शेवटी डॉ. पाटणकर यांनी बोलताना सांगितले.

रोजगार मिळावा म्हणून पुढील आंदोलन...

कोयना धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पग्रस्तांवर गेली 60 वर्ष अन्याय सुरू आहे. धरणात जमिनींसह सर्वस्व गेल्याने पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन हमालीसह मिळेल ते काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कोयना परिसरातच रोजगार मिळावा, पर्यटन वाढावे यासाठी यापुढे आंदोलन केले जाईल, असे सूतोवाच डॉ. पाटणकर यांनी केले.