होमपेज › Satara › कोयनेच्या सुरक्षेचा फाजील बागुलबुवा

कोयनेच्या सुरक्षेचा फाजील बागुलबुवा

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:31AM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना प्रकल्प आणि सुरक्षितता याचा शासन असो किंवा प्रशासन यांच्याकडून विनाकारण फाजील बागुलबुवा करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनासह स्थानिक लोकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक हे प्रकल्प इतके भक्कम आहेत, की त्यांना सहजासहजी इजा पोहोचवणे अशक्य आहे. त्यामुळे हे प्रकल्प सर्वांसाठी खुले करणे आवश्यक असल्याचे मत कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये व्यक्त केले. 

कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प याबाबत अनाठायी भीती व सुरक्षा याबाबत आपले मत व्यक्त करताना दीपक मोडक म्हणाले, कोयना प्रकल्प आणि घातपाताची शक्यता हा विषय तसा नवा नाही. मात्र, त्याच वेळी यातील वस्तुस्थिती समजावून घेत सकारात्मक बाबी होण्याऐवजी बंदी घालून नकारात्मकतेचा पायंडा पाडणे, हे योग्य नाही. वास्तविक धरण माथा व धरणाकडे जाणार्‍या सर्व ठिकाणी पोलिस चौक्या आहेत. येथे कोणीही आले तरी ओळखपत्र, परवाना तपासल्याशिवाय प्रवेशच दिला जात नाही. नेहरू उद्यानात भलेही बाहेरची व्यक्ती जाऊ शकते, तेथून धरण अगदी जवळ दिसते. मात्र त्या ठिकाणहून धरणाचे अंतर एवढे आहे, अगदी लहान दगडही कोणी धरणापर्यंत फेकू शकत नाही. अर्थातच तेथून लहान स्फोटक आणून फेकणेही तितके सोपे नाही. तर मोठ्या क्षमतेचे स्फोटक खिशातून लपवून नेता येणार नाही.

वास्तविक 1967 साली झालेला 6.7 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप या धरणाने पचवला आहे. त्यानंतर 2005 साली धरणाच्या मजबुतीसाठी सांडव्याला अगदीच चिटकून अनेक मोठे सुरूंग घेऊन खडक फोडून पाया मजबूत करण्यात आला. त्यावेळी अशा सुरूंगामुळे धरणाच्या भिंतीला काडीचेही नुकसान होणार नाही, याची खात्री होती म्हणूनच हे केले ना? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

कोयनेत पाण्यावर चार टप्प्यात जलविद्युत निर्मिती केली जाते. हे बहुतांशी प्रकल्प तर डोंगराखालीच असल्याने मुळातच त्याच्या सुरक्षिततेची काळजी या प्रकल्प 
निर्मात्यांनी अगोदरच घेतलेली आहे. त्यामुळे केवळ सुरक्षिततेच्या कारणास्तव हे प्रकल्प पाहाण्यासाठी बंदी घालणे हेही चुकीचेच आहे, असे स्पष्ट मतही दिपक मोडक यांनी व्यक्त केले.