पाटण : प्रतिनिधी
कोयना धरणातंर्गत विभागात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तथापी मंगळवारी दुपारी तीन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातूनही पूर्वेकडे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणातंर्गत विभागात पावसाचा जोर वाढल्याने धरणात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ७८ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर ७६.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक्स तर दुपारनंतर धरणाचे सहा वक्री दरवाजातून विनावापर ५००० क्युसेक असे एकूण सरासरी सात हजार क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.