Tue, Jul 16, 2019 13:38होमपेज › Satara › कोयनेच्या वाढीव पाणी क्षमतेने प्रश्‍न चिघळणार

कोयनेच्या वाढीव पाणी क्षमतेने प्रश्‍न चिघळणार

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:25PMपाटण :  गणेशचंद्र पिसाळ

साठ वर्षांहून अधिक काळ झालेल्या कोयना धरणाच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असताना याच धरणात अतिरिक्त 25 टीएमसी पाणी साठवण्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहेत. तसे झाल्यास पुन्हा जमिनी घ्याव्या लागणार आहेत. पूर्वी घेतलेल्या जमिनी मुळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात येऊ नयेत, असा अहवाल जलसंपदा विभागाने दिल्याने प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत. 

कोयना धरण निर्मिती करताना भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या होत्या. सुरूवातीला धरण 98. 78 टीएमसी साठवण क्षमतेचे होते.  नंतर धरणाच्या सहा वक्री दरवाजांची उंची वाढवून त्यात 6.50 टीएमसीने वाढ करून 105 टीएमसी करण्यात आले. दरम्यान हे काम अतिशय कमी पैशात व विना पुनर्वसनाशिवाय झाले. कारण धरण निर्मितीवेळी ज्यादा जमीन संपादित केली होती. या विनावापर पडीक जमिनी पुन्हा मुळ भूमिपुत्रांना मिळाव्यात यासाठी लढा सुरू आहे. 

प्रशासन या प्रश्‍नी अपयशी ठरले असताना आता जलसंपदा विभागाने या धरणामध्ये भविष्यात 25 टीएमसी पाणी अजूनही साठू शकतो. यासाठी धरणाची उंची वाढवून 130 टीएमसी साठवण क्षमता करता येऊ शकते. तसे झाल्यास या उर्वरित जमिनींवर पाणी आडवावे लागेल. जर या अतिरिक्त जमिनी आताच मुळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या तर भविष्यातील पुनर्वसन,  संपादनाचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. अशा प्रकारचा अहवाल संबंधित विभागांना दिला आहे. मुळात कोयना पाचवा टप्पा लालफितीत अडकून पडला आहे. तर सहावा टप्पा शासनाच्या विचाराधीन आहे. असे असताना पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा विचार प्रकल्पग्रस्तांची डोकेदुखी वाढविणारा आहे .