Wed, Mar 20, 2019 02:56होमपेज › Satara › कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर

कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:25PMपाटण : प्रतिनिधी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने कमी करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत कोयना धरणातून प्रतिसेकंद 43 हजार 612 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. दरम्यान, मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. धरणात 101.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळेच आता धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होत आहे, त्याचपटीत पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन विभागाने घेतला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर गुरुवारी धरणाचे दरवाजे सहा फुटांनी उचलण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा मंदावला आणि त्यामुळे पाण्याची आवकही थोड्या प्रमाणात घटल्यानंतर हेच दरवाजे पाच फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत. शनिवारी पावसाचा जोर असाच राहिला, तर धरणाचे दरवाजे आणखी कमी केले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सध्यस्थितीत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 96.78 टीएमसी इतका आहे. धरणातील पाणीउंची 2 हजार 160.10 फूट, जलपातळी 658.622 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 4 हजार 463 मी. मी., नवजा येथे 4 हजार 538  मी. मी. तर महाबळेश्‍वर येथे 4 हजार 69 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.