Sat, Jul 20, 2019 11:27होमपेज › Satara › कोयनेचे दरवाजे 5 फुटांवर

कोयनेचे दरवाजे 5 फुटांवर

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 9:56PMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेतीन फुटावरून पाच फुटांवर नेण्यात आले आहे. धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 24 हजार 246 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळेच कोयनेचे दरवाजे दीड फुटाने उचलून ते पाच फुटांवर स्थिर ठेवले आहेत. सहा दरवाजातून प्रतिसेकंद 22 हजार 146 क्युसेक तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 क्युसेक असे पाणी प्रतिसेकंद कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन आगामी काळात पाणी सोडण्याचे प्रमाण निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. धरणात सध्यस्थितीत 83.80 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 3 हजार 175 मि. मी., नवजा येथे 3 हजार 286 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 2 हजार 862 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.