Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

कोयना प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

विद्यमान वारसदारांना स्वतंत्र खातेदार धरून संकलन रजिस्टर करावे व त्यानुसार पुनर्वसन प्रक्रिया राबवावी, धरणग्रस्तांच्या सर्व वसाहतींना  अधिकृत वसाहती घोषित करावे,  धरणग्रस्तांची ससेहोलपट थांबवून 100 टक्के पुनर्वसन करण्याचा वेगवान कालबद्ध कार्यक्रम तातडीने सुरू करावा आदी मागण्यांसाठी श्रमिक मुक्‍ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.

आजवर पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर राजकारण केले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न प्रलंबित ठेवून जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी पळवले, अशी टीका प्रकल्पग्रस्त संपत देसाई, दीपक साळवी, हरिश्‍चंद्र दळवी, केशव काटकर यांनी केली. श्रमुदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घ्यायची नाही, असे मोबाईलवरून आवाहन केले. 

निवेदनात म्हटले आहे, महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना सवलती द्याव्यात. धरणग्रस्तांवर पुन्हा सह्याद्री प्रकल्पामुळे बाधित होण्याची  वेळ आली आहे. पुनर्वसनाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय या ठिकाणी तातडीने वॉर रूम सुरू करावी, ज्यांना जमीन दिली गेली नाही, तसेच दिलेली जमीन पिकावू नाही, त्यांना दरमहा 1500 रुपये निर्वाहभत्ता जमीन मिळेपर्यंत द्यावा, यासह विविध मागण्या केल्या आहेत.