Thu, Nov 15, 2018 16:16होमपेज › Satara › जानेवारीतही कोयनेत मुबलक पाणीसाठा 

जानेवारीतही कोयनेत मुबलक पाणीसाठा 

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 10:19PM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

जानेवारी उजाडला तरी कोयना धरणात तब्बल 94  टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. तांत्रिक महिन्यांपैकी पाच महिन्यांसाठी वीजनिर्मितीसह सिंचनासाठीही हा पाणीसाठा दिलासा देणारा आहे. या पाणीसाठ्यामुळे वीज निर्मितीसह व सिंचनाची चिंता मिटली आहे. मात्र त्याचवेळी मुबलक पाणी उपलब्ध असतानाही कमी पाणीवापर व त्याचपटीत कमी वीज निर्मिती यामुळे महसूली तोटा मात्र सहन करावा लागत आहे. 

कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे असे असते. कॅलेंडर वर्षामुळे या तांत्रिक वर्षापैकी सात महिन्यांचा कालावधी संपला आहे. या काळात पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पैकी केवळ 26.04 टीएमसी पाणीवापर झाला आहे. वीज निर्मितीला पाच महिन्यांसाठी 41.46 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या शिल्लक कोठ्यामुळे वीज निर्मितीची चिंता निदान या प्रकल्पापुरती तरी मिटली आहे. सिंचनाची गरज वाढत चालल्याचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून आहे. जवळपास 35 टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरण्यात आले. आत्तापर्यंत यासाठी 6.39 टीएमसी  पाणीवापर झाला आहे.

त्यामुळे आगामी काळात सुमारे 29 टीएमसीची गरज भागविणेही शक्य आहे. त्यामुळे आता एकूण 94 टीएमसी  शिल्लक कोठ्यापैकी पश्‍चिमेकडील  वीज निर्मितीसाठी 41, सिचंनासाठी 29 व मृतसाठा 5 अशा 75 टीएमसी पाण्यानंतरही आगामी तांत्रिक वर्षाच्या सुरूवातीला 19 हून अधिक टीएमसी  पाणीसाठा शिल्लक रहाणार आहे. शिवाय सर्वसामान्यांनासह उद्योजकांनाही हा दिलासा ठरणार आहे. ज्यादा पाणीसाठा शिल्लक असला तरी गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीवापर झाल्याने तब्बल 555 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झाल्याने त्यातून राज्याला अब्जावधींच्या महसुली तोट्यालाही सामोरे जावे लागले आहे. मात्र पाण्याचा नियोजनबध्द वापर झाला तर हाही तोटा भरून निघेल.