Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Satara › रोशनच्या अवयवदानाने सहाजणांना जीवदान

रोशनच्या अवयवदानाने सहाजणांना जीवदान

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 10:38PMकोरेगाव : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय रोशन घोरपडे या युवकाचा अपघात झाला होता. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांची समजूत घातल्यानंतर रोशनचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. अपघातानंतर लगेचच रोशनचे डोळे, त्वचा, फुफुसे, लिव्हर आणि किडनी हे अवयव काढण्यात आले. हे अवयव इतर रूग्णांना मिळाल्याने रोशनमुळे 6 जणांना जीवदान मिळाले आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रोशन घोरपडे या 19 वर्षीय युवकाचा इंदोली फाट्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. अधिक उपचारासाठी सातार्‍यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

यावेळी हॉस्पिटलचे डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. साठे व डॉ. निलेश साबळे यांनी रोशनच्या कुटुंबियांना अवयवदानाबद्दल माहिती देऊन रोशनचे अवयवदान करण्यास प्रोत्साहित केले. आपल्या मुलाच्या माध्यमातून इतर लोकांना जीवदान मिळेल, असे डॉक्टरांनी सांगितले. 

कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणजे रोशनचे आजोबा पांडुरंग घोरपडे हे वारकरी संप्रदायातील असल्याने त्यांना ही कल्पना योग्य वाटली. हा निर्णय म्हणजे अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणे आहे. त्यामुळे त्यांनी रोशनचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रोशनच्या आई सौ. वंदना सुनील घोरपडे, आणि वडील सुनील पांडुरंग घोरपडे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी याला मान्यता दिली.
यानंतर रोशनचा मृतदेह पुणे येथील रूबी हॉस्पिटला नेऊन त्याच्या डोळ्यांचे कॉर्निया, त्वचा, लिव्हर, किडनी, फुफुसे हे अवयव काढण्यात आले. यामध्ये सातार्‍याच्या कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. हृदय व फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेने पुनर्जीवन लाभलेल्या कोमल पवार हिने दिवसभर कुटुंबीय व हॉस्पिटलच्या संपर्कात राहून फुफ्फसे योग्य वेळेत पोहचवण्यासाठी पाठपुरावा केला. कोमलला स्वतःला अवयवदानाचा लाभ मिळाल्याने तिची ही धडपड सुरू होती. कोणत्याही रूग्णाला सहजासहजी फुफ्फुसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रोशनची फुफ्फुसे गरजू रूग्णाला मिळावी, यासाठी ती प्रयत्नशील होती. दरम्यान, यानंतर कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनच्या सदस्यांनी घोरपडे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांच्या या निर्णयाचा अभिमान वाटतो असे सांगून फाऊंडेशनच्या वतीने सन्मानपत्र दिले.