Mon, Aug 19, 2019 00:44होमपेज › Satara › पॅसेंजरच्या धडकेत कोपर्डेचा युवक ठार 

पॅसेंजरच्या धडकेत कोपर्डेचा युवक ठार 

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:18PMकोरेगाव : प्रतिनिधी 

तांदूळवाडी (ता. कोरेगाव) येथे रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी पहाटे सातारा-कोल्हापूर पॅसेंजरच्या धडकेत अक्षय बाबासाहेब कदम (वय 25, रा. कोपर्डे, ता. सातारा) याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कदम याच्या पायातील बूट फाटकाजवळ उभ्या असलेल्या डंपरच्या पाठीमागील चाकांजवळ आढळल्याने हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.     

अक्षय कदम हा घरातील एकलुता मुलगा होता. बारावी परीक्षेत अनुतीर्ण झाल्याने तो घरीच होता. पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणातील स्थापत्यविषयक काम करणार्‍या सांगली येथील सह्याद्रि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये  मित्र काम करत असल्याने अक्षयदेखील अकरा दिवसांपूर्वी या कंपनीमध्ये पर्यवेक्षक म्हणून कामावर रुजू झाला होता. कंपनीने त्याला तांदुळवाडी येथील साईटवर नेमले होते. व्यायामाची आवड असल्याने तो दररोज पहाटे धावण्यासाठी जात होता. शुक्रवारी पहाटे 5.15 च्या सुमारास तो आपल्या खोलीतून  धावण्यासाठी बाहेर पडला. कानात मोबाईलचा हेडफोन घातला असल्याने तांदुळवाडी रेल्वे फाटकानजिक त्याला सातार्‍याकडून कोल्हापूरकडे जाणार्‍या पॅसेंजरचा आवाज आला नाही आणि पॅसेंजरची धडक बसून त्याचा मृतदेह बाजूला जाऊन पडला. रेल्वेच्या फाटकावरील कर्मचार्‍याच्या ही बाब लक्षात आल्यावर त्याने कोरेगाव रेल्वे स्थानकावर ही माहिती दिली. अक्षय हा बराच वेळ झाला तरी खोलीवर परत न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतल्यावर अक्षय याचा मृतदेह रेल्वे मार्गानजिक पडलेला आढळला. त्याच्या पायातील एक बूट फाटकानजिक उभ्या असलेल्या सह्याद्रि कन्स्ट्रक्शन कंपनीच्या डंपरच्या पाठीमागील चाकाजवळ आढळून आला. 

याबाबत स्थानिक पोलीस पाटील यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर हवालदार राजू बागवान यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यानच्या काळात कदम कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयात जावून कोणत्याही परिस्थितीत कोरेगावात शवविच्छेदन करणार नसल्याचा पवित्रा घेतला. अक्षय याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करुन सातारा येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची मागणी केली. 
पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सपोनि संतोष साळुंखे यांना घटनास्थळी पाहणी करण्यास पाठविले. पोलिसांच्या पत्रावर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी नातेवाईकांच्या मागणीनुसार सातार्‍यात शवविच्छेदन करण्यात यावे, असा शेरा मारुन मृतदेह सातार्‍याकडे पाठवून दिला आहे.  

शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात रेल्वे अपघातामध्ये अक्षय कदमचा मृत्यू झालेला नसून तो संबंधित ठेकेदाराच्या डंपरमुळे झाला असण्याची शक्याता आहे. कारण मयताच्या पायातील एक बुट डंपरखाली व दुसरा साठ फुटांपेक्षाही लांब असलेल्या रेल्वे रुळानजीक संबंधीत नातेवाईक व मित्रांना आढळून आला. अपघाता दरम्यान त्याचा स्वत:चा मोबाईल खोलीत असताना त्याने हेडफोन लावण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. पहाटे घडलेल्या अपघाताची खबर बारा वाजता मिळते यातच गडबड घोटाळा असून जिल्हा पोलिस प्रमुखांना घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी ग्रामस्थ सातारा येथे गेले असून जोपर्यंत संशयीतावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट करीतच संबंधित जमाव मयत अक्षयचा मृतदेह घेवून सातारा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मार्गस्थ झाले.कुटुंबातील  एकुलता एक मुलगा अक्षयच्या अपघाती मृत्यूने कदम कुटुंबीय अक्षरश: दु:खाच्या खाईत लोटले आहे. रेल्वे प्रशासनासह संबंधित ठेकेदार यांच्याकडून तपासावेळी पोलिसांनी सत्य वदवून घेतले तरच मोलमजुरी करुन पोट भरणार्‍या वृद्ध आईवडीलांना न्याय मिळणार आहे.